विजयापासून कोण ‘वंचित’ राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:19 AM2019-04-06T00:19:59+5:302019-04-06T00:20:04+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांतील निवडणूक दुरंगीच होणार हे स्पष्ट असले, तरी यावेळेला वंचित बहुजन आघाडीचा त्रास कुणाला ...

Who will be 'deprived' from victory? | विजयापासून कोण ‘वंचित’ राहणार?

विजयापासून कोण ‘वंचित’ राहणार?

Next

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांतील निवडणूक दुरंगीच होणार हे स्पष्ट असले, तरी यावेळेला वंचित बहुजन आघाडीचा त्रास कुणाला होणार याबद्दल आतापासूनच आकडेमोड सुरू झाली आहे. अटीतटीच्या लढतीत अशा अन्य पक्षांनी घेतलेली मते निर्णायक ठरत असल्याचे आजपर्यंतचे चित्र आहे.
गेल्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष, बहुजन मुक्ती पक्ष, भारिप बहुजन महासंघ, महाराष्ट्र विकास आघाडी यांच्या उमेदवारांना एकत्रित मिळालेली मते २५ हजार ७२९ होती. ‘शेकाप’चे माजी आमदार संपतराव पवार यांना १३ हजार १६२ मते मिळाली. नोटाला मिळालेली मते ७०१५ होती आणि खासदार धनंजय महाडिक हे ३३ हजार २५९ मतांनी विजयी झाले. हातकणंगले मतदारसंघात याच चार पक्षांना मिळालेली एकत्रित मते २३ हजार २७० होती. नोटाला १० हजार ५९ मते मिळाली. हे सर्व उमेदवार रिंगणात नसते, तर त्यांची एकगठ्ठा मते एकाच कुणाला मिळाली नसती, हे खरेच आहे. या वेळेला ‘शेकाप’ हा काँग्रेसच्या आघाडीत आहे.
डावे, आंबेडकरवादी, रिपब्लिकन जनतेचे नेतृत्व करणारे पक्ष हे पारंपरिक काँग्रेसला पूरक विचारधारा असणारे पक्ष आहेत. त्यातही मुख्यत: मुस्लिम समाज हा भाजप-शिवसेनेकडे फारसा वळत नाही. या पक्षांना कोण पराभूत करेल, त्यांच्या पाठीशी हा समाज अनेकदा राहिला आहे. भीमा- कोरेगावच्या प्रकरणानंतर डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जी भूमिका घेतली, त्यातून दलित समाजातून त्यांना पाठबळ मिळाल्याचे वातावरण तयार झाले आहे. या वेळेला त्यांच्यासोबत एमआयएम हा पक्षदेखील आहे. या पक्षांचे पाठीराखे मतदार एकगठ्ठा मतांसाठी बांधील असल्याचे आजपर्यंत दिसले आहे. त्याची झलक कोल्हापुरात शिवाजी स्टेडियममध्ये झालेल्या त्यांच्या प्रचार सभेवेळी दिसली आहे. जिथे पूर्वी आठवले गटाचे फलक गावाच्या वेशीजवळ दिसायचे, तिथे आता अनेक गावांत वंचित बहुजन आघाडीच्या शाखा झाल्या आहेत; त्यामुळे या आघाडीचे दोन्ही उमेदवार नवखे असले तरी त्यांचा मतांचा टक्का यावेळी वाढण्याची चिन्हे आहेत. विरोधात निवडणूक लढविणाऱ्या पक्षांचा रोख नेहमीच सत्तारूढ नेतृत्वावर असतो; त्यामुळे आताही दोन्ही मतदारसंघांत या पक्षाचे टार्गेट हे काँग्रेस आघाडीचेच उमेदवार असणार आहेत.

Web Title: Who will be 'deprived' from victory?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.