मंत्रिमंडळ विस्तारानंतर लागणार 'देवस्थान'च्या नियुक्त्यांचा मुहूर्त, अध्यक्षपद कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:01 IST2024-12-10T12:00:45+5:302024-12-10T12:01:55+5:30
भाजपकडून शिर्डी व पंढरपूर देवस्थानची मागणी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर लागणार 'देवस्थान'च्या नियुक्त्यांचा मुहूर्त, अध्यक्षपद कुणाला?
कोल्हापूर : राज्यात महायुतीचे सरकार आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर महायुतीमधीलच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वर्णी लागणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, अध्यक्षपद, कोषाध्यक्षपद नेमके कोणाला, हे मंत्रिमंडळ विस्तार व अधिवेशनानंतरच ठरेल. त्यासाठी आणखी किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे.
राज्यात ज्या पक्षाची सत्ता, त्याच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर नियुक्ती होते. पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी देवस्थानवर हाेते. त्यानंतर तब्बल १० वर्षे जिल्हाधिकाऱ्यांनी समितीचे प्रशासक म्हणून कामकाज पाहिले आहे. मात्र, २०१४ साली भाजप शिवसेनेची सत्ता आल्यानंतर समितीचे अध्यक्षपद भाजपकडे व कोषाध्यक्षपद शिवसेनेकडे गेले. दोन्ही पक्षांचे तीन-तीन कार्यकर्ते देवस्थानचे सदस्य झाले.
मात्र, २०२१ साली कार्यकाल पूर्ण होण्याआधीच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे समिती बरखास्त झाली आणि पुन्हा जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष, तथा प्रशासक झाले. तेव्हापासून आजतागायत समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. मात्र, आता विधानसभेला जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिल्याने देवस्थानवरील नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे.
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट असे तीन पक्ष आहेत. त्यामुळे देवस्थान समितीवर या तीन पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियुक्ती होईल. अध्यक्ष व कोषाध्यक्षपद कुणाकडे जाणार, हा निर्णय महत्त्वाचा असणार आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतरच देवस्थान समितीसह सर्व महामंडळांवरील नियुक्त्या केल्या जातील. खाते वाटप झाल्यानंतर तीनही पक्षांच्या नेत्यांची चर्चा होऊन महामंडळांवरील त्यांचा कोटा ठरविला जाईल. त्यानंतर कोणत्या महामंडळावर कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्याची नियुक्ती, हे ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी आणखी किमान १ ते दीड महिना लागणार आहे.
अशी आहे देवस्थानची रचना
अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, सहा सदस्य
औत्सुक्याचा विषय
यापूर्वी भाजपकडे अध्यक्षपद व शिवसेनेकडे कोषाध्यक्षपद होते. आता शिवसेनेचे सर्वाधिक ३ आमदार जिल्ह्यातून निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेने अध्यक्षपद मागितले आहे. भाजपकडून शिर्डी व पंढरपूर देवस्थानची मागणी होत आहे. कोल्हापूरचे अध्यक्षपद कुणाकडे जाईल, हे औत्सुक्याचे ठरेल.
आधीच फिल्डिंग
देवस्थानवरील नियुक्तीसाठी आधीच जिल्ह्यातील तीनही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी फिल्डिंग लावली आहे. पूर्व अध्यक्ष महेश जाधव यांना आता आमदारकी हवी आहे. राष्ट्रवादीदेखील अध्यक्षपदावर दावा करीत आहे. पूर्वी नियुक्ती झालेल्यांना पुन्हा संधी देऊ नये, अशी काही संस्थांची मागणी आहे.