उदगावातील अपघाताचे नियंत्रण राखणार कोण?

By admin | Published: March 3, 2017 11:03 PM2017-03-03T23:03:37+5:302017-03-03T23:03:37+5:30

पोलिस व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : वारंवार अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Who will control the accident in Udgawa? | उदगावातील अपघाताचे नियंत्रण राखणार कोण?

उदगावातील अपघाताचे नियंत्रण राखणार कोण?

Next

संतोष बामणे --जयसिंगपूर --सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील अवजड व बेकायदेशीर वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गाला पर्यायी मार्ग असतानाही जयसिंगपूर शहरातून होत असलेल्या वाहतुकीमुळे वारंवार उदगाव परिसरात अपघात होत आहेत. त्यामुळे अवजड व बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जयसिंगपूर शहरातून अवजड वाहने नकोत यासाठी सांगलीकडून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी उदगाव, केपीटी, नांदणी नाका, चौंडेश्वरी असा मार्ग, तर कोल्हापूरहून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, उदगाव असा मार्ग उपलब्ध आहे. मात्र, अवजड वाहतूक करणाऱ्या चालकांना एक ते दोन किलोमीटरचा त्रास नको, यासाठी जयसिंगपूर शहरातून सर्रास अवजड वाहनांची वाहतूक केली जाते.
उदगाव बसस्थानक व टोलनाका परिसरात अरुंद रस्ते व अतिक्रमण असल्यामुळे सातत्याने लहान-मोठे अपघात व वाहतुकीची कोंडी होत आहे. येथील बसस्थानक हे महामार्गावर असल्याने प्रवाशांच्याही जिवाला धोका निर्माण झाला
आहे. तसेच खोत पेट्रोलपंप याठिकाणी असलेले बाह्य वळण, महामार्गालगत असलेला नवीन वैरण बाजार, बसस्थानक, शिरोळ रस्ता, रेल्वे ओव्हरब्रिज, टोल नाका याठिकाणीच वारंवार अपघात
होऊन अनेकांनी आपला जीव गमावला आहे.


अपघाताचे क्षेत्र
सांगली-कोल्हापूर महामार्गावर वारंवार अपघात होत असलेले ठिकाणी म्हणून उदगाव या गावची ओळख झाली आहे.
जयसिंगपूर, सांगली, शिरोळ, चिंचवाड, बायपास कोल्हापूर, रेल्वेस्टेशन असे मार्ग उदगावमध्ये येत असल्याने अरुंद रस्त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत.
उदगाव बसस्थानक व टोल नाका परिसरातील अतिक्रमणे काढण्यासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घेतला पाहिजे.


पोलिस चौकीची गरज
शिरोळ तालुक्यातील उदगाव हे २२ हजार लोकसंख्या असलेले निमशहरी गाव आहे. याठिकाणी होत असलेले अपघात, अवैध धंदे, बेकायदेशीर उत्खनन, ओव्हरलोड वाहतूक होत असते. यामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. त्यातच अपघातग्रस्त या गावची ओळख असल्यामुळे उदगाव येथे पोलिस चौकीची गरज आहे.

Web Title: Who will control the accident in Udgawa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.