इच्छुकांच्या खर्चाला लगाम कोण लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:35 AM2021-02-23T04:35:44+5:302021-02-23T04:35:44+5:30
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीची अद्यापही तारीख निश्चित झालेली नाही. तोपर्यंत इच्छुकांनी खिसा रिकामा करणे सुरू केले आहे. विरोधकांपूर्वी मतदारांपर्यंत ...
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीची अद्यापही तारीख निश्चित झालेली नाही. तोपर्यंत इच्छुकांनी खिसा रिकामा करणे सुरू केले आहे. विरोधकांपूर्वी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यामध्ये जणूकाही स्पर्धाच सुरू आहे. काहींनी देवदर्शन सहल, हळदी-कुंकू, सभा, जेवणावळींचा सपाटाच लावला असून, आचारसंहितेपूर्वीच्या त्यांच्या या खर्चाला लगाम कोण लावणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपली आहे. कोरोनामुळे काही महिने महापालिका निवडणुकीची प्रक्रिया थांबली होती. आरक्षण जाहीर झाले असून, मतदार यादी करण्याचे काम सुरू आहे. १२ मार्चला अंतिम मतदार यादी प्रभागनिहाय जाहीर होणार आहे. दरम्यान, ८१ प्रभागांत इच्छुकांकडून फिल्डिंग लावणे सुरू आहे. गाठीभेटी, माहितीपत्रक वाटप केले जात आहे. यासह सहल, हळदी-कुंकू, सभा, जेवणावळींचा सपाटा लावला जात आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवाराला प्रचारासाठी खर्च निश्चित केलेला असतो. रोज खर्चाच्या नोंदी निवडणूक विभागाला द्याव्या लागतात. बहुतांशी उमेदवार खरा खर्च देत नाहीत, हा भाग वेगळा आहे; परंतु यामुळे उमेदवारांवर काहीअंशी अंकुश असतो. सध्या आचारसंहिता जाहीर झाली नसल्यामुळे खर्चावर मर्यादाच राहिलेली नाही. आचारसंहितेपूर्वीच रोज लाखाेंचा चुरडा होत आहे.
चौकट
मतदारांना ‘देवदर्शन’
उद्यानाच्या नावे असलेल्या प्रभागातील एका इच्छुकाने ५०० महिलांना देवदर्शन घडवून आणले. जेवण, नाष्टा, पाणी बॅटलसह मास्कचे वाटपही त्यांनी केले. असाच काही प्रकार आता इतर प्रभागांतही पाहावयास मिळत आहे. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने भेट वस्तू देणे, सभेला चहा, नाष्टा आणि जेवणावळीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. सध्या तरी यावर कोणाचेच नियंत्रण नाही, हे वास्तव आहे.
चौकट
राज्यात काही जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनानेही कडक नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या जरी येथील स्थिती नियंत्रणात असली तरी रुग्ण वाढल्यास निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत आहे, असे घडल्यास हे इच्छुकांच्या डोकेदुखीचे कारण ठरणार असून, त्यांचा खर्च वाढतच राहण्याची चिन्हे आहेत.