साईक्स एक्स्टेंशनमधून कोणाला मिळणार ‘एक्स्टेंशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:20 AM2021-01-15T04:20:21+5:302021-01-15T04:20:21+5:30
विनोद सावंत/ लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : व्यापारी पेठ, उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या साईक्स एक्स्टेंशन प्रभाग क्रमांक २४ मध्ये यंदाच्या ...
विनोद सावंत/
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : व्यापारी पेठ, उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या साईक्स एक्स्टेंशन प्रभाग क्रमांक २४ मध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत. येथील निवडणूक अटीतटीची बनली आहे. नागरिकांचा मागासवर्ग महिला या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांचा पत्ता कट झाला असला तरी त्यांनी पत्नीला रिंगणात उतरविले आहे. गेल्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली असून त्यांची विजयी घोडदाैड रोखण्याचे आव्हान राष्ट्रवादीसह, भाजप, ताराराणी आघाडीसमोर आहे.
साईक्स एक्स्टेंशन प्रभाग गतवेळच्या महापालिका निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्ग झाला होता. त्यावेळीही चुरशीची निवडणूक झाली होती. यामध्ये काँग्रेसचे संजय मोहिते विजयी झाले. त्यांना भाजपचे कुलदीप देसाई, शिवसेनेचे आजम जमादार यांनी तगडे आव्हान दिले होते. संजय मोहिते यांनी या प्रभागात दोनवेळा प्रतिनिधीत्व केले आहे. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांची प्रभागात रोज फेरी असते. उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, शिक्षण समिती सभापती अशी त्यांनी पदे भूषविली आहेत. शिक्षण समिती सभापती असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून निधी संकलित करून बुट, टाय आणि सॉक्स असे साहित्य दिले. त्यांचा प्रभागात चांगला जनसंपर्क आहे. आमदार, खासदार फंडातून निधी खेचून आणून अनेक विकासकामे केली आहेत. केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी पत्नी माधुरी मोहिते यांना रिंगणात उतरवले आहे.
माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांच्या पत्नी माजी नगरसेविका मृदाला पुरेकर या ही निवडणूक लढविणार असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. तसेच गत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले आजम जमादार यांनी पत्नी जस्मीन जमादार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. जमादार गेली दहा वर्षे सामाजिक कामात आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून त्यांनी प्रभागात विकासकामे केल्याचा दावा केला आहे. धनंजय महाडिक युवाशक्तीचे शहर अध्यक्ष रहिद सनदी यांनी पत्नी असिया सनदी यांनाही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या उच्चशिक्षित असून जनतेचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याच्या इराद्याने त्या मैदानात उतरल्या आहेत. याचबरोबर मानसी भालकर, नितीन पाटील यांच्या पत्नींच्या नावाचीही चर्चा आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही काहीजण पत्ते उघडण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया
प्रभागात १९९० पासून सामाजिक काम करीत आहे. पाच वर्षांत सुमारे चार कोटींचा निधी खेचून आणला आहे. परिख पूल येथे सांडपाण्याची समस्या होती. साडेसात लाखांच्या निधीतून चॅनेल बांधून ती सोडविण्याचा प्रयत्न केला. प्रभागात ‘क्रिकेटर सेल्फी कॉर्नर’, ‘हास्य कलाकार सहवास’ असे अनोखे उपक्रम राबविले आहेत. गेल्या ९ वर्षांत ६ वेळा स्वच्छतेसाठी प्रभागाला पुरस्कार मिळाला. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ठेवी संकलित करून कायमस्वरुपी मोफत बूट देणे, राजारामपुरी दुसरी गल्लीतील ओपनस्पेस विकसित करण्याचा मानस आहे.
संजय मोहिते, विद्यमान नगरसेवक
चौकट
पाच वर्षांत झालेली विकास कामे
प्रभागामध्ये ठिकठिकाणी उत्तम अशी नागरिकांना बसण्याची सोय
जयप्रकाश नारायण उद्यानात ओपन जिमसह विविध विकासकामे, औढ्याच्या चॅनेलचे ७० टक्के काम पूर्ण
बी. टी. कॉलेज ते जिल्हा बँक रस्ता
पाच बंगला परिसरातील अंतर्गत रस्ते
महेंद्र ज्वेलर्स ते साहेबा हॉटेल परिसरात एलईडी, ड्रेनेजलाईन, रस्त्याचे काम
दासराम डेपो ते रेल्वे फाटक येथील ४१ लाखांच्या निधीतून रस्ते, बाजू पट्टीची कामे
जनता बाजार चौक येथे दरवर्षी पावसामुळे पाणी साचत होते, गतवर्षी गाळ काढून कायमचा प्रश्न मार्गी
लॉ कॉलेज येथे क्रॉस ड्रोनचे काम
५० लाखांच्या निधीतून लॉ काॅलेज ते टाकाळा चौक रस्ता
चौकट
प्रभागातील समस्य
सखल भाग असल्याने परीख पूल येथे अद्यपही सांडपाण्याची समस्या
परीख पूल ते टाकळा रस्ता खराब
काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा
पार्कींगची समस्या
मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी पादचारी पुलाचे काम रखडले.
परिख पूल परिसरातील कचरा कोंडळाची दुरवस्था
फोटो : १४०१२०२१ केएमसी परिख पूल
ओळी : कोल्हापुरातील साईक्स एक्स्टेंशन प्रभागामधील परिख पूल ते टाकळा मार्गावरील कचरा कोंडळे फाटले असून रस्त्यावर कोंडळा पसरत आहे.
फोटो : १४०१२०२१ केएमसी परिख पूल २
ओळी : कोल्हापुरातील साईक्स एक्स्टेंशन प्रभागामध्ये विद्यमान नगरसेवक संजय मोहिते यांनी आमदार फंडातून निधी आणून नागरीकांना बसण्यासाठी सुविधा केली आहे. ‘महानायिका सहवास’, ‘हस्यकलाकार सहवास’ अशा अनोख्या संकल्पनेतून त्यांनी जुना कलाकारांना आठवणींना उजाळा देण्याचे चांगले काम केले आहे.