शिरोळमध्ये बिनविरोधचा मान कोण मिळविणार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:21 AM2021-01-02T04:21:13+5:302021-01-02T04:21:13+5:30
शिरोळ : छाननीनंतर आता उमेदवारी अर्ज माघारीकडे लक्ष लागून राहिले आहे. तीन दिवसांचा अवधी माघार घेण्यासाठी शिल्लक राहिला असून ...
शिरोळ : छाननीनंतर आता उमेदवारी अर्ज माघारीकडे लक्ष लागून राहिले आहे. तीन दिवसांचा अवधी माघार घेण्यासाठी शिल्लक राहिला असून बिनविरोध ग्रामपंचायतीचा नारळ कोण फोडणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील ३३ गावांतील ४२५ जागांसाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. छाननीनंतर दोन जागा बिनविरोध झाल्यामुळे ४२३ जागांसाठी १९४२ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. जांभळी येथे ६०, तेरवाड ८१, शिरढोण ६४, शिरदवाड ६७, अर्जुनवाड ५५, घोसरवाड ७१, दत्तवाड ११०, उदगाव ७९, कोथळी ६५, दानोळी ११७, धरणगुत्ती ७२, चिपरी ९३, यड्राव ९४ असे उच्चांकी अर्ज या प्रमुख गावांमध्ये शिल्लक राहिले आहेत.
दरम्यान, अनेक गावांमध्ये बिनविरोध निवडणुकीचे वारे वाहू लागले असले तरी, काही जागांवरून मतभेद होत आहेत. त्यामुळे अशा ग्रामपंचायतीत बिनविरोधला खो बसणार असल्याचे चित्र आहे. ४ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे राजकीय वातावरण तापले असले तरी, ३३ ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत बिनविरोधचा नारळ कोण फोडणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
चौकट -
बिनविरोधसाठी गावपुढाऱ्यांचे प्रयत्न
अनेक गावांत बिनविरोध निवडणुका पार पाडण्यासाठी गावपुढाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. जागेवरून मतभेद होत आहेत, तर निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण निघणार असल्याने सरपंच कोणत्या गटाचा यावरूनही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.