इच्छुकांच्या भाऊगर्दीत हातकणंगलेची ‘साथ’ कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:16 AM2019-07-23T01:16:04+5:302019-07-23T01:16:52+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने तसेच अनेकजण व्यक्तिगत पातळीवर लढण्याची तयारी करीत असल्याने येथे बहुरंगी लढत होणार हे निश्चित आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीत कोण बाजी मारणार? सुजित मिणचेकर यावेळी हॅट्ट्रिकसाधणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Who will 'support' the handcuffs of the aspirants? | इच्छुकांच्या भाऊगर्दीत हातकणंगलेची ‘साथ’ कोणाला?

इच्छुकांच्या भाऊगर्दीत हातकणंगलेची ‘साथ’ कोणाला?

Next
ठळक मुद्देबहुरंगी लढत निश्चित : विद्यमान आमदारांसह पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना वंचित फॅक्टरची चिंता; बंडखोरीचीही भीती

दत्ता बीडकर ।
हातकणंगले : हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर, काँग्रेसचे राजूबाबा आवळे आणि जनसुराज्यचे राजीव आवळे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच यावेळीही स्पष्ट लढत असली तरी लोकसभेला बहुजन वंचित आघाडीने या मतदारसंघात जोरदार मुसंडी मारल्यामुळे विधानसभेला प्रस्थापित उमेदवारांना ‘वंचित’ची चिंता लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने तसेच अनेकजण व्यक्तिगत पातळीवर लढण्याची तयारी करीत असल्याने येथे बहुरंगी लढत होणार हे निश्चित आहे. इच्छुकांच्या भाऊगर्दीत कोण बाजी मारणार? सुजित मिणचेकर यावेळी हॅट्ट्रिकसाधणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

हातकणंगले मतदारसंघात तालुक्यामधील ६२ पैकी ५७ गावांचा समावेश आहे. शहरालगतची मोठ्या लोकवस्तीची गावे या मतदारसंघामध्ये असल्याने गाव तिथे गटबाजी उफाळून आलेली आहे. काँग्रेस (आय), राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, जनसुराज्य, मनसेसह इतर लहान-लहान पक्षांचे कार्यकर्ते या मतदारसंघात आपलीच ताकत असल्याच्या भ्रमात आहेत.

काँग्रेस (आय)चा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ २००४ च्या निवडणुकीत जनसुराज्यच्या राजीव आवळे यांनी काबीज केला. २००९ च्या बहुरंगी लढतीमध्ये शिवसेनेचे सुजित मिणचेकर यांनी काँग्रेसचे राजूबाबा आवळे यांचा अवघ्या २००४ मतांनी पराभव करीत या मतदारसंघात भगवा फडकविला. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे आ. सुजित मिणचेकर काँग्रेसचे माजी मंत्री जयंवतराव आवळे, जनसुराज्यचे राजीव आवळे या प्रमुखांसह स्वाभिमानी, राष्ट्रवादी यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात होते. मात्र, शिवसेनेचे सुजित मिणचेकर दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले. मिणचेकर यांनी विकासकामांचा जोर ठेवला असला तरी पंचगंगा प्रदूषण, रखडलेले क्रीडा संकुल, हुपरी चांदी कल्स्टर, माणगाव येथील रखडलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे प्रश्न अपुरेच राहीले आहेत.

शिवसेनेमधील निष्ठावंत शिवसैनिकांना विकासकामे आणि शासकीय पदापासून दूर ठेवल्यामुळे जिल्हाप्रमुख गट आणि आमदार गट अशी गटबाजी आजही या मतदारसंघामध्ये उघड आहे. १९९९च्या निवडणुकीत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवणारे स्व. आकाराम दबडे यांचे चिरंजीव संदीप दबडे यांनी गावोगावी संपर्क वाढविल्यामुळे शिवसेनेमध्ये त्यांची बंडखोरी अटळ बनली आहे.

काँग्रेस (आय)चे राजूबाबा आवळे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये गावोगावी संपर्क ठेवलेला आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्याबरोबर जुळवून घेतल्यामुळे गावपातळीवरील गट-तट, हेवेदावे संपल्यामुळे त्यांचा फायदा आवळे यांना होणार आहे. जवाहर साखर कारखाना, नव महाराष्ट्र, आयको, महात्मा फुले या सूतगिरण्याच्या उद्योग रोजगाराचा फायदाही आवळे यांना होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यास पंचगंगा साखर कारखाना रत्नाप्पाण्णा कुंभार गटाची आणि शरद साखर कारखाना व राजेंद्र पाटील यड्रावकर गटाची ताकदही आवळे यांना मिळणार आहे.

जनसुराज्यचे माजी आ. राजीव आवळे याचाही जनसंपर्क चांगला असल्यामुळे त्यांनीही लढण्याची तयारी केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये जनसुराज्यने चांगले यश मिळविले आहे. हातकणंगले पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती जनसुराज्य पक्षाचा असल्यामुळे त्यांनी या माध्यमातून निवडणूक तयारी केली आहे. जनसुराज्य हा भाजपचा मित्रपक्ष असल्याने सेना-भाजप युतीमध्ये जनसुराज्यचे त्रांगडे झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये विधानसभा स्वतंत्र लढण्यावर एकमत घडविले जात आहे. कार्यकर्ते काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको, त्यापेक्षा वंचित आघाडीबरोबर जमवून घेण्यासाठी नेत्यांना विनंत्या करीत आहेत. लोकसभेला राजू शेट्टी यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागल्यामुळे भाजप आणि शिवसेना उमेदवाराला विरोध करण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यामुळे जात फॅक्टर महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने या मतदारसंघामध्ये जोरदार मुसंडी मारत ४२३२५ मते मिळवून सर्वच राजकीय पक्षांची हवा टाईट करून सोडली आहे. वंचित आघाडीमुळे प्रथमच दलित आणि मुस्लिम मतांची एकी झाली आहे. वंचितच्या गावागावांमध्ये शाखा तयार झाल्या आहेत. प्रत्येक समाजमंदिरामध्ये बैठका घेऊन जातीय समीकरणे पटवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. वंचित आघाडी कोणाबरोबर जाणार यावरच या मतदारसंघाची बिघाडी ठरलेली आहे.

भाजप-शिवसेना युतीचे जागा वाटप फिस्कटले तर भाजप-जनसुराज्य या मतदारसंघात एकत्र येण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडल्यास या मतदारसंघाचे गणित वंचित आघाडी कोणाबरोबर जाणार यावर बिघडणार हे मात्र निश्चित.

 

डॉ. मिलिंद हिरवे आणि डॉ. अविनाश सावर्डेकर यांनी वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जनसंपर्क ठेवला आहे. जनसुराज्यची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याची खात्री या दोन डॉक्टरांकडून दिली जात आहे.
भाजपचे शिरोळ जिल्हा परिषद

सदस्य अशोक माने यांनीही भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जनसंपर्क वाढविला आहे.
शिवसेनेकडून स्व. आकाराम दबडे यांचे चिरंजीव संदीप दबडे यांनी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू करून गावोगावी जनसंपर्क वाढविला आहे. उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याचा दबडे यांचा पवित्रा आहे.


बहुजन वंचित आघाडीकडून अ‍ॅड. इंद्रजित कांबळे (जयसिंगपूर) व प्रेमकुमार माने यांच्यामध्ये उमेदवारीसाठी चुरस आहे. उमेदवारी मिळो ना मिळो इच्छुक लढण्यावर ठाम आहेत.

Web Title: Who will 'support' the handcuffs of the aspirants?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.