पार्किंगच्या पैशांवर ‘डल्ला’ मारणाऱ्यांना वेसण कोण घालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:21 AM2021-02-08T04:21:02+5:302021-02-08T04:21:02+5:30

कोल्हापूर : बिंदू चौकातील पार्किंगच्या पैशांवर केएमटी कर्मचाऱ्यांकडून डल्ला मारण्याचा प्रकार सुरूच आहे. पर्यटकांना केवळ एका तासाची २५ रुपयांची ...

Who will take care of those who are squandering parking money? | पार्किंगच्या पैशांवर ‘डल्ला’ मारणाऱ्यांना वेसण कोण घालणार?

पार्किंगच्या पैशांवर ‘डल्ला’ मारणाऱ्यांना वेसण कोण घालणार?

Next

कोल्हापूर : बिंदू चौकातील पार्किंगच्या पैशांवर केएमटी कर्मचाऱ्यांकडून डल्ला मारण्याचा प्रकार सुरूच आहे. पर्यटकांना केवळ एका तासाची २५ रुपयांची पावती दिली जात असून, त्यापुढील दोन ते तीन तासांचे पैसे खिशात घालण्याचा प्रकार रोज होत आहे. याद्वारे येथील एक कर्मचारी किमान दोन हजारांची वरकमाई करीत असल्याचे समजते. कुंपणच शेत खात आहे, अशी येथील स्थिती आहे. केएमटीची लूट करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना कोण वेसण घालणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेने तोटा कमी करण्यासाठी ११ पे अँड पार्किंगचे ठेके केएमटीला दिले. सध्या केएमटीचे चार ठिकाणी पे अँड पार्किंग सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा बिंदू चौकातील पे अँड पार्किंग आहे. सलग सुट्ट्या आल्यानंतर येथील पार्किग हाऊसफुल्ल होते. येथील ठेक्यासाठी महापालिकेतील काही नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू असून एकाने तर वर्षाला ८९ लाखांची निविदा भरली आहे. दोन्ही नगरसेवकांच्या वादात ठेका देण्याचे काम थांबले आहे. दरम्यान, केएमटी कर्मचाऱ्यांची मात्र, लूट सुरूच आहे. मलई मिळत असल्याने बिंदू चौकातील पार्किंगवर नियुक्तीसाठी चढाओढ असते. तपासणीसाठी कोणी अधिकारी आल्यास जादाचे पैसे सापडू नयेत म्हणून तेथील एका दुकानात किंवा पंटरकडे पैसे दिले जातात. दिवसभर पैसे ठेवल्याबद्दल त्यालाही काही वाटा दिला जातो.

चौकट

बिंदू चौक पार्किंगमधून दिवसा उत्पन्न : २५ हजार

अपेक्षित उत्पन्न : ३० हजार

ठेकेदाराकडून वर्षासाठी निविदा : ८९ लाख

रोजची कर्मचारी संख्या : ६

चौकट

पार्किंगचे प्रतितास दर

दुचाकी - ५ रुपये

चारचाकी - २५ रुपये

अवजड वाहने - ३० रुपये

चौकट

बिंदू चौकातील पार्किंगमध्ये घोटाळा सुरू असल्याचे माहीत असूनही ठरावीकच कर्मचाऱ्यांची येथे नियुक्ती होते. कामगार, सोसायटीतील पुढारी आणि अधिकारी, नगरसेवकांच्या मर्जीतील लोकांचीच येथे ड्यूटी ठरलेली आहे. यामध्ये वरिष्ठांचाही हात असल्याचा संशय आहे.

प्रतिक्रिया

कर्मचाऱ्यांचा हा प्रकार थांबविण्यासाठी सहायक वाहतूक निरीक्षकांना पार्किंगच्या ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश दिले जातील. येथे आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसवू. प्रारंभी पैसे न घेता केवळ प्रवेश पावती दिली जाईल. नंतर बाहेर जाताना एकूण रकमेची पावती देण्याच्या सूचना देऊ.

- चेतन कोंडे, सहायक आयुक्त, महापालिका.

फोटो : ०७०२२०२१ कोल केएमसी पार्कींग न्यूज

ओळी : कोल्हापुरातील बिंदू चौकातील पार्किंग नेहमी वाहनांनी भरलेले असते.

Web Title: Who will take care of those who are squandering parking money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.