पन्नास लाखाचे बक्षीस घेणार कोण... फोन अजून आलाच नाही.. पोलीस प्रतिक्षेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 05:55 PM2019-04-03T17:55:26+5:302019-04-03T18:00:21+5:30
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील फरार मारेकरी संशयित विनय बाबूराव पवार (वय ४०, रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा), सारंग दिलीप अकोळकर ऊर्फ कुलकर्णी (३८, रा. डी. एस. के. चिंतामणी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे) यांची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले
-एकनाथ पाटील
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील फरार मारेकरी संशयित विनय बाबूराव पवार (वय ४०, रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा), सारंग दिलीप अकोळकर ऊर्फ कुलकर्णी (३८, रा. डी. एस. के. चिंतामणी अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे) यांची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या सात दिवसांत पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या फोन नंबरवर एकही कॉल आला नसल्याचे सूत्रांनीच स्पष्ट केले. शासन आणि तपास यंत्रणेच्या आवाहनाला जनतेतून प्रतिसाद दिसत नसल्याचे चित्र आहे. या दोघा संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध राज्यांत विशेष पथके रवाना केली आहेत. तपास पथकांमध्ये आणखी सात नवीन अधिकाऱ्यांना घेतले आहे. ते अधिकारी नेमके करतात तरी काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोळकर या दोघांचा पानसरे हत्येमध्ये समावेश असल्याचे ‘एस.आय.टी.’ने दोषारोपपत्रानुसार न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या दोघांची माहिती आणि फोटो असलेली भित्तिपत्रके देशात व राज्यातील शासकीय कार्यालये, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी चिकटवून, वर्तमानपत्रांतही (वाँटेड) असल्याची माहिती प्रसिद्ध केली आहे. दोघेही सन २००९ च्या मडगाव बॉम्बस्फोटापासून फरार आहेत. त्यापासून पोलीस यंत्रणा त्यांचा शोध घेत आहे. तपास यंत्रणेचे सुराग थांबल्याने संशयित पवार आणि अकोळकर यांची जनतेतून माहिती मिळण्यासाठी २७ मार्चला शासनाने ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे), विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, अप्पर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, विशेष तपास पथक, एसआयटी यांचे फोन क्रमांक प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांनी माहिती द्यावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले होते. गेल्या सात दिवसांत या नंबरवर संशयितांची माहिती देण्यासाठी किती फोन आले, या संदर्भात प्रत्येक कार्यालयाच्या फोन नंबरवर चौकशी केली असता आजपर्यंत असा एकही फोन आला नसल्याचे येथील कर्मचाºयांनी सांगितले.
चुकीचा नंबर आहे....
गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) या कार्यालयाच्या नंबरवर संपर्क साधला असता येथील महिला हवालदाराने ‘पवार आणि अकोळकर कोण आहेत?’ असा प्रश्न केला. सविस्तर माहिती दिल्यानंतर असा फोन आला नसल्याचे सांगितले. तसेच हा चुकीचा नंबर दिला आहे. नियंत्रण कक्षाशी संपर्क सांधा, असे सांगण्यात आले.
पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे; त्यामुळे या गुन्ह्याच्या संदर्भात कोणतीही माहिती आम्ही देऊ शकत नाही.
- वरिष्ठ पोलीस अधिकारी, कोल्हापूर