‘फुलेवाडी रिंगरोड’चा विजय कोणाच्या पारड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:22 AM2021-02-10T04:22:56+5:302021-02-10T04:22:56+5:30

विद्यमान नगरसेवक : रिना कांबळे आताचे आरक्षण : नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग तानाजी पोवार लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापालिका ...

Who won the 'Phulewadi Ring Road'? | ‘फुलेवाडी रिंगरोड’चा विजय कोणाच्या पारड्यात

‘फुलेवाडी रिंगरोड’चा विजय कोणाच्या पारड्यात

Next

विद्यमान नगरसेवक : रिना कांबळे

आताचे आरक्षण : नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग

तानाजी पोवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत नेहमी नव्या चेहऱ्यांना संधी देणारा, काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदार संघ म्हणजे प्रभाग क्र. ७३ फुलेवाडी रिंगरोड होय. यंदा या प्रभागावर नागरिकांचा मागासवर्गीय (ओबीसी) हे आरक्षण जाहीर झाल्याने अगोदरपासूनच ओबीसी दाखले असलेल्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली. अनेक इच्छुकांचे दाखले अद्याप हाती नसल्याने त्यांचे मनसुबे उधळले.

तब्बल तीस छोट्या-मोठ्या कॉलन्या असलेला व नेहमीच्याच समस्यांनी ग्रासलेला हा फुलेवाडी रिंगरोड प्रभाग होय. गतवेळच्या निवडणुकीत प्रभागावर अनुसूचित जाती महिला आरक्षण पडल्याने अनेक इच्छुक नाराज झाले होते, त्याचा लाभ उठवत काँग्रेसच्या रिना बंडू कांबळे यांनी बाजी मारली होती. त्यावेळी निवडणूक झाली, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेवर आली पण तरीही पुढील पाच वर्षे हा प्रभाग म्हणजे राजकीय कुरघोडीचे केंद्र ठरला होता. त्यामुळे प्रभागाला अपेक्षित निधीच मिळाला नसल्याने हा प्रभाग विकास कामांपासून वंचित राहिल्याचे दिसते. गेल्या वीस वर्षांत प्रभागावर नेहमीच काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. त्यामुळे येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारांत रस्सीखेच सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीतील उमेदवारांचे आराखडे पाहता या प्रभागावर पुन्हा काँग्रेसचा अगर मित्रपक्षाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर येथे सामाजिक कार्यकर्त्याचे पीक आले असून इच्छुकांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे प्राथमिक चित्र दिसते.

प्रभागातील मुख्य रिंगरोड वगळता येथे अंतर्गत रस्ते, गटर्स, ओपन स्पेस, उद्यान, शाळा तसेच प्रॉपर्टी कार्ड हे मूलभूत प्रश्न अद्याप आहे त्याच स्थितीत आहेत. त्यामुळे या प्रश्नावरच येथील निवडणूक रंगणार आहे. गतवेळी आरक्षणामुळे शांत बसण्याची वेळ आलेले विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांनी रिंगरोड डांबरीकरण, पाणी प्रश्न आदी विषयांवर अनेकवेळा आंदोलने करीत यंदा निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. ते मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते असले तरीही स्वीकृत नगरसेवकपदाच्या राजकीय घडामोडीनंतर त्यांनी पाच वर्षात महाडिक गटासोबत वेगळी चूल मांडली होती. पण आता त्यांनी उमेदवारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांचे पर्याय खुले ठेवले आहेत. त्याशिवाय माजी नगरसेवक बाळासाहेब बोंद्रे यांच्या स्नुषा अक्षता अभिजीत बोंद्रे यांनीही काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. शिवाय बाळासाहेब कात्रट यांनीही काँग्रेसशी एकनिष्ठता दाखवत पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. कुमार चौगुले, उदय सासने हेही काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चाचपणी करत आहेत. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष सचिन सुतार, विनायक मोरे यांनीही भाजपच्या बळावर लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बाबुराव बोडके हेही चाचपणी करत आहेत.

ऐन निवडणुकीत इच्छुकांचा वावर धनगर वाड्यात

प्रभागातील सुमारे साडेचार हजार मतदारांपैकी फक्त धनगर समाजाचे सुमारे १६०० मतदान आहे. या समाजाच्या मतांच्या गठ्ठ्यावरच प्रत्येक निवडणुकीत येथील राजकारण घडते. ज्यांच्या हाती हा मतांचा गठ्ठा तोच नगरसेवक अशीच येथील रणनिती आहे. त्यामुळे या मतांच्या गठ्ठ्यावर येथील इच्छुकांनी आपले विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे गेली पाच वर्षे गायब असणाऱ्या काही समाजसेवकांचा धनगर वाड्यात वावर वाढला आहे.

शिल्लक राहिलेली कामे

- काही कॉलन्यात अंतर्गत रस्ते

- अमृत योजनेचे काम अपूर्ण

- मुख्य रिंगरोडची गळती कायम

- कॉलनीत कमी दाबाने पाणीपुरवठा

- ओपन स्पेस अविकसित

- शाळा, उद्यान कमतरता

- गटर्सअभावी सांडपाणी समस्या

- मातंग वसाहतीचा प्रॉपर्टी कार्ड प्रश्न प्रलंबित

- ज्येष्ठ नागरीकांना विरंगुळा केंद्र

प्रभागातील झालेली कामे

- काही कॉलन्यात अंतर्गत रस्ते सुरू

- चॅनल काम

- अमृत योजनेची कामे सुरू

- प्रभागात पथदीप

- श्रीकृष्ण कॉलनी पाणीप्रश्न निकाली

- काही भागात ड्रेनेज लाईन

गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते :

- रिना बंडू कांबळे (काँग्रेस) : १३९५

- मीनाक्षी सुरेश मेस्त्री (भाजप) : ७४४

- सुनीता गजानन मोरे (शिवसेना) : ३२७

- अयोध्या भास्कर दाभाडे (राष्ट्रवादी) : ३३१

कोट...

राजकीय घडामोडींमुळे मला काम करण्यासाठी अपुरा कालावधी मिळाला. अशा परिस्थितीतही सुमारे चार कोटी रुपयांची विकासकामे केली. सर्वसामान्यांसाठी मिनी हॅाल उभे करण्याचे स्वप्न अधुरे राहीले.

- रिना कांबळे, विद्यमान नगरसेविका.

फोटो नं. ०९०२२०२१-कोल-फुलेवाडी रिंगरोड

ओळ : फुलेवाडी रिंगरोड प्रभागात राजेसंभाजी नगरामध्ये गटर्स नसल्याने सांडपाणी निर्गतीची समस्या कायम आहे.

Web Title: Who won the 'Phulewadi Ring Road'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.