‘आजरा’च्या पाठीशी संपूर्ण ताकद

By admin | Published: May 19, 2016 12:39 AM2016-05-19T00:39:31+5:302016-05-19T00:42:29+5:30

चंद्रकांतदादा यांची ग्वाही : आजरा येथे महाआघाडीची प्रचारसभा

The whole strength behind 'Azra' | ‘आजरा’च्या पाठीशी संपूर्ण ताकद

‘आजरा’च्या पाठीशी संपूर्ण ताकद

Next

आजरा : स्व. वसंतराव देसाई यांनी मोठ्या कष्टातून आजरा साखर कारखान्याची उभारणी केली आहे. सहकारात अनिष्ठ प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. काही नेतेमंडळी अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहेत, ही बाब गंभीर असल्याने आजरा साखर कारखान्यातून अशा प्रवृत्तींना बाहेर काढण्यासाठी स्व. वसंतराव देसाई महाआघाडीच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी राहणार आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
आजरा कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्व. वसंतराव देसाई महाआघाडीच्या वतीने आयोजित प्रचारसभेत सहकारमंत्री पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे होते.
प्रास्ताविकपर भाषणात विष्णुपंत केसरकर म्हणाले, विरोधी आघाडीकडून आकसापोटी साखर वाटप व एफ.आर.पी. शिल्लक हप्त्याबाबत आपण विरोध केला, असे आरोप करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. साखर कारखाना निवडणुकीत परिवर्तनाची लाट तयार झाल्याने असे बेछूट आरोप केले जात आहेत.
सहकारमंत्री पाटील म्हणाले, कारखाना सक्षमपणे चालून सभासदांना चांगला दर देण्यासाठी आता कारखाना विस्तारीकरणाबरोबर सहवीज व डिस्टीलरी प्रकल्प सुरू करणे गरजेचे असून, यासाठी सहकारमंत्री म्हणून आपण सरकारदरबारी प्रयत्न करू.
आ. प्रकाश आबिटकर म्हणाले, आजरा साखर कारखान्यात परिवर्तन होणार हे सांगण्यासाठी आता ज्योतिषाची गरज राहिली नाही. सभासदांनी महाआघाडीला दिलेला प्रतिसाद पाहता विरोधक या वादळात निश्चित भुईसपाट होतील.
माजी आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, श्रीमती रेडेकर-शिंपी व कथित नेतेमंडळींची अभद्र युती या निवडणुकीत झाली आहे. अशावेळी अशा मंडळींना कारखान्यातून हाकलून घालवण्यासाठी महाडिक उद्योगसमूह महाआघाडीच्या पाठीशी आहे. ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खोत म्हणाले, श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची ही निवडणूक आहे. अशावेळी सत्ताधाऱ्यांना पैशाची मस्ती आली आहे. ती मस्ती उतरवण्याची गरज आहे.
अशोकअण्णा चराटी म्हणाले, माझा आणि आजरा कारखान्याचा संबंध काय म्हणणाऱ्या मंडळींनी भरमूअण्णा पाटील यांनी मंत्री असताना आपल्या प्रयत्नातून तीन कोटी रुपयांचे भागभांडवल मिळवून दिले हे विसरू नये. माजी आमदार के. पी. पाटील यांचा तरी बिद्री कारखान्याशी काय संबंध आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. खासगी साखर कारखाना चालविणाऱ्यांनी सहकारावर बोलू नये, असा टोलाही मुश्रीफ यांना लगावला. सभेस माजी आमदार संजय घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, आ. सुरेश हाळवणकर, राजेंद्र गड्ड्यानवार, हिंदुराव शेळके, बाबा देसाई, बाळासाहेब कुपेकर, सरपंच शीला सावंत, अन्नपूर्णादेवी चराटी, बाबूराव कुंभार, संभाजी पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आजरा येथे स्व. वसंतराव देसाई आघाडीच्या प्रचारसभेत बोलताना सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील. यावेळी माजी नगरसेवक आर. डी. पाटील, पुंडलिक जाधव व आघाडीचे अन्य मान्यवर नेते उपस्थित होते.

Web Title: The whole strength behind 'Azra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.