घाऊक बाजारातील किरकोळ विक्री बंद
By admin | Published: September 30, 2015 12:28 AM2015-09-30T00:28:26+5:302015-09-30T00:35:36+5:30
बाजार समिती : व्यापाऱ्यांना दिलासा--लोकमतचा दणका
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारातील किरकोळ विक्री अखेर मंगळवारपासून बंद करण्यात आली. गेली अनेक वर्षे पणन कायदा धाब्यावर बसवून ही विक्री सुरू होती. समिती संचालक मंडळाने संबंधित व्यापाऱ्यांना आदेश काढून किरकोळ विक्री बंद करण्यास सांगितल्याने मिनी मार्केटमधील किरकोळ व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बाजार समितीने १९९३ ला गाळे बांधून भाजीपाला, फळे, कांदा-बटाट्याचे मिनी मार्केट तयार केले. त्यामध्ये ७२ गाळे आहेत. समितीत होणाऱ्या लिलावात माल घेऊन त्याची किरकोळ विक्री करावी, या उद्देशाने मिनी मार्केट उभे राहिले. सुरुवातीला हे मार्केट चांगले चालले; पण गेल्या पाच-सहा वर्षांपासून घाऊक भाजीपाला मार्केटमध्येच किरकोळ विक्री सुरू केली आणि मिनी मार्केटमधील व्यवसायच संपला. घाऊक बाजारात माल घ्यायचा आणि तिथेच त्याची विक्री करण्याचे काम ३२ व्यापारी करीत आहेत. याबाबत मिनी मार्केटमधील व्यापारी समितीकडे तक्रार करीत होते. समितीने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने किरकोळ व्यापारी हवालदिल झाले होते. याबद्दल ‘न्यायालयीन आदेशाची बाजार समितीत पायमल्ली’ या मथळ्याखाली २६ आॅगस्टला ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. त्यानंतर समितीची यंत्रणा खडबडून जागी झाली. त्याची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी समितीकडे खुलासा मागितल्याने या प्रकरणाने गती घेतली.
गेली चार वर्षे आम्ही याबाबत प्रशासनाकडे दाद मागत होतो. ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यामुळे तेथील किरकोळ विक्री बंद झाली. तिथे किरकोळ विक्री करणारे आमचेच बांधव आहेत. त्यांनी मिनी मार्केटमध्ये येऊन व्यवसाय करावा. त्यास आमची हरकत नाही.
- यशोदा पाटील, किरकोळ व्यापारी, मिनी मार्केट