धमकीचा फोन कोणाचा? पोलीस चक्रावले, सायबर विभागाला नंबर सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 04:08 PM2019-10-12T16:08:24+5:302019-10-12T16:11:41+5:30
कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी; यासाठी त्यांच्या मातोश्री सुहासिनीदेवी घाटगे यांना मोबाईलवर आलेल्या दोन नंबरांचा अद्यापही पोलिसांना सुगावा लागलेला नाही.
कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी; यासाठी त्यांच्या मातोश्री सुहासिनीदेवी घाटगे यांना मोबाईलवर आलेल्या दोन नंबरांचा अद्यापही पोलिसांना सुगावा लागलेला नाही.
सायबर विभागाचे तज्ज्ञ कसून शोध घेत असून, त्यांना घाटगे यांच्या मोबाईलवरील इनकमिंग डाटा उपलब्ध झालेला नाही. नंबर सापडत नसल्याने धमकी फोन प्रकरणाचा गुंता वाढला आहे. धमकी दिल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस कसून तपास करीत आहेत.
सुहासिनीदेवी घाटगे यांच्या दोन मोबाईल नंबरवर धमकीचे फोन शुक्रवारी (दि. ४) आणि शनिवारी (दि. ५) आले होते. त्याचे वृत्त प्रसिद्ध होताच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. धमकी कोणी दिली याची उत्सूकता संपूर्ण जिल्ह्याला लागून राहिली आहे. घाटगे यांच्या मोबाईलवर आलेल्या फोनबाबत पोलिसांनी संबंधित कंपनीकडे इनकमिंग नंबरची माहिती मागितली आहे.
या तपासासाठी सायबरतज्ज्ञांची मदत घेतली जात आहे; पण त्याबाबत अद्याप काहीही हाती लागलेले नाही. धमकी आलेला नंबर अद्याप पोलिसांना मिळाला नसल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. या प्रकरणाला राजकीय वास आहे काय, याची चाचपणी करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक कागलकडे गुरुवारी (दि. १0) गेले होते. त्यांनी माहिती घेतली असता, हाती काहीच लागले नाही.
सुहासिनीदेवी घाटगे यांना आलेल्या धमकीचा तपास सुरू आहे. नंबर मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल. अद्याप सायबर विभागाकडून नंबर प्राप्त झालेला नाही. अद्याप एकही धागा हाती लागलेला नाही. नंबर मिळताच आरोपी स्पष्ट होईल, तो मिळविण्यासाठी सायबरसह शाहूपुरी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
कुंदन गाडे,
सहायक निरीक्षक, तपास अधिकारी