‘व्हॉट्सअॅप’ची झाडू दोन वर्षांनंतरही फिरतेय
By admin | Published: March 12, 2016 01:10 AM2016-03-12T01:10:22+5:302016-03-12T01:10:22+5:30
कचऱ्याची विगतवारी : राजापुरातील महिलांची स्वच्छता मोहीम; ग्रुपचा विनाखंड सक्रिय सहभाग
विनोद पवार --राजापूर -सुमारे दोन वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकत्र येत स्वच्छतेचा वसा घेतलेल्या राजापुरातील महिलांनी स्वच्छतेची मोहीम अद्याप कायम ठेवली आहे. आधी केले अन् मग सांगितले, या उक्तीप्रमाणे ग्रुपधील सर्व सदस्यांनी स्वत: शहरातील सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा स्वच्छ केला आणि आता सुका कचरा ओला कचरा अशी विगतवारी करण्यापासून स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम विनाखंड सुरू ठेवले आहे. दोन वर्षांपासून हाती घेतलेली व्हॉट्सअॅपची झाडू अखंडपणे राजापुरात फिरत असून, त्यांचे हे कार्य अनेकांसाठी आदर्शवत असेच आहे.
देशात मोदी सरकार स्थानापन्न झाल्यानंतर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आले. सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, याबाबतीत प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. शहरी भागासह ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता करण्यात आली. शासनाच्या या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणत लोकसहभागही दिसून आला. सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या. काही कालावधीनंतर प्रशासकीय पातळीवर स्वच्छतेच्या बाबतीत उदासिनता दिसू लागली. मात्र, याच कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या राजापुरातील सर्व भगिनींनी आपली ही स्वच्छतेची मोहीम विनाखंड सुरु ठेवली आहे.
प्रारंभी आठवड्यातून एकदा या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एसएमएस मिळताच एकत्र येत शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा महिलांनी साफ करण्याचे काम केले. त्यानंतर त्या ठिकाणी तसेच वैयक्तिक ठिकाणची स्वच्छता राहावी, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ठरवून एकत्र येण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्याला ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या त्या सर्व ठिकाणी स्वच्छता करण्याबरोबरच जागृती करायची, असा नित्यक्रमच या महिलांनी ठरवून घेतला आहे. फक्त त्याचा प्रतिसादच त्या त्यावेळी ग्रुपवर टाकला जातो. एखाद्या ठिकाणी मोहीम राबवायची आवश्यकता असेल आणि तशी बाब कुणाच्या निदर्शनास आली तर त्याबाबतचा एक एसएमएस ग्रुपवर टाकला जातो. दिवस, वेळ सांगतिली जाते व त्यानुसार ज्यांना जाणे शक्य होते, ते सर्वजण संबंधित ठिकाणी पोहोचतात. मोहीम फत्ते होते व त्याचे पुन्हा अपडेट्स ग्रुपवर टाकले जातात. कोण आले नाही म्हणून त्याच्यासाठी काम थांबत नाही किंवा कोणी उगाच चीडचीड करत नाही. जे हजर असतात, ते सर्व सदस्य आपली जबाबदारी समजून काम पार पाडतात. या ग्रुपमध्ये कोणी अध्यक्ष नाही की कोणी नेताही नाही.
प्रारंभी कोणतेही नाव धारण न करता केवळ स्वच्छ भारत अभियान नावाने चालणारा हा ग्रुप आता मोहोर ग्रुप, राजापूर या नावाने सुरु आहे. यामध्ये स्मिता अभ्यंकर, गौरी अभ्यंकर, रुपाली केळकर, श्रुती ताम्हणकर, अपूर्वा मराठे, नेत्रा गोखले व कृष्णा करंबेळकर हे सर्व सदस्य आहेत. यामध्ये कोणीही नेता नसून सर्वजण आपले स्वत:चे काम समजून परिसर स्वच्छ करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली ही मोहीम अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा निर्धारच सर्वांनी केला आहे.