कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन रात्रीच्या अंधारात का?, शिवसेनेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 04:32 PM2022-09-24T16:32:29+5:302022-09-24T16:32:57+5:30
अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत तातडीची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. हे करताना कमालीची गोपनीयता पाळली गेली.
कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीला असे काय झाले होते की तातडीने मूर्तीचे संवर्धन करावे लागले. रात्री कोणतेही धार्मिक कार्य करणे चुकीचे असताना रात्री आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवून रासायनिक प्रक्रिया का करण्यात आली, हे करताना समिती का नेमली नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर मोर्चा काढण्यात आला.
सचिव शिवराज नाईकवाडे यांना निवेदन दिल्यानंतर कोणत्या व्यक्तींनी आणि शासनस्तरावर काय पत्रव्यवहार झाला, कोणामुळे हे घडले, याची माहिती मिळाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. आज शनिवारी ही कागदपत्रे कार्यकर्त्यांना सुपूर्द केली जाणार आहेत.
अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत तातडीची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. हे करताना कमालीची गोपनीयता पाळली गेली. हे उघडकीस आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी देवस्थान समितीवर मोर्चा काढून जाब विचारण्यात आला. विजय देवणे म्हणाले, एका पुजाऱ्याने सांगितले म्हणून पुरातत्व खात्याने तातडीने संवर्धन प्रक्रिया केली, असे होणार नाही. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांनी, सरकारने हस्तक्षेप करत ही प्रक्रिया केली, हे उघड झाले पाहिजे. प्रशासनानेदेखील कुणाच्या सांगण्यावरून हे केले स्पष्ट व्हावे. रवी इंगवले यांनी याला जबाबदार असलेल्या घटकांवर कारवाईची मागणी केली.
मुनीश्वर यांचा पाठपुरावा..
देवस्थानचे सचिव नाईकवाडे यांनी ही प्रक्रिया व्हावी, यासाठी पुजारी गजानन मुनीश्वर यांनी पाठपुरावा केला. देवस्थान समितीने हा प्रस्ताव पाठवला नव्हता. समितीलादेखील निर्णय आल्यावरच कळाले असल्याचे सांगितले. आज शनिवारी या प्रक्रियेची कागदपत्रे कार्यकर्त्यांना दिली जाणार आहेत.