कळणाऱ्यांचे सरकार असूनही भरपाईला उशीर का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:11+5:302021-08-19T04:28:11+5:30
नेसरी : ज्यांना शेतीतलं कळत नव्हतं त्यांनी गेल्यावेळी महापुरात बुडालेल्या पिकांच्या भरपाईसह पीककर्जही माफ केले होते. ज्यांनी पीककर्ज काढले ...
नेसरी :
ज्यांना शेतीतलं कळत नव्हतं त्यांनी गेल्यावेळी महापुरात बुडालेल्या पिकांच्या भरपाईसह पीककर्जही माफ केले होते. ज्यांनी पीककर्ज काढले नव्हते. त्यांना गुंठ्याला ४०० रुपये दिले होते. आता कळणाऱ्यांचे सरकार असूनही अद्याप भरपाई मिळालेली नाही, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी नेसरी येथील पत्रकार परिषदेत महाआघाडी सरकारला लगावला.
अलमट्टी, हिडकलसंदर्भात संयुक्त करार करावा
राजू शेट्टी : पाण्याची भरपाई परवडेल, पण पूरहानी परवडणारी नाही
गडहिंग्लज :
अलमट्टीच्या बॅक वॉटरमुळेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह बेळगाव जिल्ह्यातील अथणी, चिक्कोडी व निपाणी तालुक्याला तर हिडकलमुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यासह सीमाभागाला वारंवार महापुराचा मोठा फटका बसतो. तो टाळण्यासाठी दोन्ही राज्यांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन पाणी साठवण्याच्या नियोजनाबाबत संयुक्त करार करावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथील पत्रकार परिषदेत केली.
बुधवारी (२३) जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ते गडहिंग्लज विभागाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शेट्टी म्हणाले, काही नद्या बारमाही झाल्या असून काही जानेवारीपर्यंत प्रवाहित असतात. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टीतील पाणीसाठ्याची उंची ५०९ मीटरच ठेवावी. त्यानंतर गरजेप्रमाणे ५२२ मीटर उंचीपर्यंत पाणी साठवायला हरकत नाही. यासंदर्भात योग्य नियोजन व्हावे यासाठी आपण कर्नाटक व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
---------------------
जमिनीचीही भरपाई मिळाली पाहिजे
आजरा : अतिवृष्टीमुळे पिकांबरोबर जमीनही खरडून वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पिकांबरोबर जमिनीचीही भरपाई द्यावी, अशी मागणी पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चामध्ये करणार आहोत, अशी माहिती माजी खासदार शेट्टी यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.
पूरग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा व पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा, पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी माफ करावे यासाठीच हा मोर्चा काढला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार व खासदार असताना प्रशासनावर वचक राहतो, शेतकऱ्यांची कामे होतात, मात्र राज्यपाल महोदयांनी विधानपरिषद आमदारकीबाबत वयोमानानुसार निर्णय घेतलेला नाही. मात्र, माझे डोळे मिटण्यापूर्वी आमदार करा असे माझे मतही नाही, असेही खासदार राजू शेट्टी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
----------------------
५० हजारांचे अनुदान त्वरित द्या
चंदगड :
अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. वेळेत कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले ५० हजारांचे अनुदान तातडीने द्यावे. तसेच यावर्षी पीककर्ज न घेतलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही भरीव स्वरूपाची भरपाई मिळावी, अशी मागणी माजी खासदार शेट्टी यांनी केली.
कोवाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोवाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम व दुंडगेचे सरपंच राजू पाटील यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या.
यावेळी स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, जयसिंगपूरचे नगरसेवक शैलेश चौगुले, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, आजरा तालुकाध्यक्ष तानाजी देसाई, चंदगड तालुकाध्यक्ष दीपक पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------
फोटो ओळी : कोवाड (ता. चंदगड) येथे पूरग्रस्तांच्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजेंद्र गड्यान्नावर, दीपक पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : १८०८२०२१-गड-०८