...मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही ?

By admin | Published: March 7, 2016 01:25 AM2016-03-07T01:25:42+5:302016-03-07T01:32:54+5:30

नानांचा सरकारला सवाल : केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन

Why do not the farmers have any reason? | ...मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही ?

...मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही ?

Next

कोल्हापूर : हमीभाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. शासन कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देत आहे त्याबद्दल दु:ख नाही; परंतु शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव का देत नाही, असा सवाल प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी केला. सर्वच पक्षांतील राजकारण्यांनी विश्वासार्हता गमाविल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या नाम फौंडेशनला सामान्य माणूसही आर्थिक मदत करीत आहे, असेही त्यांनी राजकीय नेत्यांच्या तोंडासमोर स्पष्ट केले.
येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या ‘खास शैली’त त्यांनी राजकारण्यांचा समाचार घेत अंतर्मुख करण्यास भाग पाडले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, महापौर अश्विनी रामाणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अभिनेते पाटेकर म्हणाले, पेन, पाण्याची बाटली अशा सर्वच वस्तूंचे दर ठरलेले आहेत; पण शेतकऱ्यांच्या मालाचा भाव निश्चित नाही. परिणामी तो आर्थिक अडचणीत येतो आहे. आपल्या आई-वडिलांच्या आजारपणातील औषधोपचाराचा खर्च तो करू शकत नाही. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्याला अपयश येते. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. आई, वडील, दोन लेकरांना मागे सोडून तो गळफास घेतो. बळिराजाला एकाकी वाटत आहे. तो निराश झाला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी संप केल्यानंतर शासनाचे अडते.त्यामुळे तेथे शासन झुकते. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर कोणाचेही अडत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष दुर्लक्ष झाले आहे. बैलाच्या गळ्यातील दोरी राज्यकर्त्यांच्या गळफासासाठी वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणू नये. वीज, पाणी सर्व शेतकऱ्यांना देण्याची माफक अपेक्षा राज्यकर्त्यांनी पूर्ण करावी. अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा आणि संघर्ष करत जगण्याची उमेद देण्यासाठी नाम फौंडेशन कार्यरत आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही, जे दिसतंय ते बोलतो. शरद पवार जवळचे मित्र आहेत. बाळासाहेब ठाकरे वडिलांच्या स्थानी आहेत. मात्र, कधी हात पसरला नाही. हात पसरले की किमतीचे लेबल लागते अन् मैत्री संपते.
एकेकाळी भाकरीचा तुकडा केशवराव भोसले नाट्यगृहाने दिला आहे; पण आता पहिल्यानंतर हेच केशवराव भोसले नाट्यगृह का असा प्रश्न पडावा, अशी नूतनीकरण करून रूप पालटले आहे. शासनाच्या निधीतून नूतनीकरण झालेले नाट्यगृह सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी पुढची जबाबदारी प्रेक्षकांची आहे. माझं म्हणून नाट्यगृहाची जपणूक करणे गरजेचे आहे. न ऐकल्यास पान, तंबाखू खाऊन नाट्यगृहात थुंकणाऱ्यांच्या कानपटीतही लावा. नेमकेपणाने कुठे हात उचलावे, हे कोल्हापूरकरांना माहीत आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, नाट्यगृहासाठीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शासन निधी देईल. सुर्वेनगर, कळंबा परिसरातील उपनगरांत महापालिकेने दुसरे नाट्यगृह बांधण्याचे नियोजन करावे.
आमदार पाटील म्हणाले, येत्या अधिवेशनात सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे मानधन नाम फौंडेशनला द्यावे. त्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घ्यावा. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, रामनवमीदिवशी माझा वाढदिवस असतो. यंदाच्या वाढदिवसादिवशी ११ लाखांचा निधी नाम फौंडेशनला देणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, संगीत नाटकांची परंपरा जपण्यासाठी त्या नाट्यनिर्मात्यांना विशेष अनुदान द्यावे.
आमदार राजेश क्षीरसागर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची भाषणे झाली. शाहीर आझाद नाईकवडी यांनी पोवाडा सादर केला. संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे वंशज व नातू सुरेश शिंदे आदींचा सत्कार झाला. आदिल फरास यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक गैरहजर राहिले.

शेणही... मेथी म्हणून सांगण्याची वेळ
आमच्या नटाचं बरं असते. सर्व काही खुलेपणाने बोलता येते. चुकला असेल तर त्याचवेळी झोडता येते. राजकारण्याचं तसे नसते, त्यांना पक्षाची आचारसंहिता पाळावी लागते. आपल्याच पक्षातील एखाद्याने ‘शेण’ खाल्ल्यानंतर तर पक्षाची बदनामी झाली म्हणून मनात खूप राग, चीड असते. मात्र, पक्षाच्या बंधनामुळे ‘शेणही मेथीची भाजी होती,’ असे सांगावे लागते, असा उपरोधिक टोला पाटेकरांनी राजकारण्यांना लगावताच प्रेक्षकांतून दाद मिळाली. भाषणात त्यांनी ‘टू बी आॅर नॉट टूबी’ असे अनेक डायलॉग त्यांनी सादर केले.
खणखणीत आवाज पाहिजे
महापौर अश्विनी रामाणे यांनी सरकारकडून विकासकामांसाठी निधीची मागणी केली. त्या भाषण वाचून दाखविताना अडखळत होत्या. घाबरत बोलत असल्याचे जाणवत होते. हे निदर्शनास आल्यानंतर भाषण संपताच रामाणे यांना व्यासपीठावर खणखणीत आवाजात भाषण करायचे घाबरायचे नाही, असे नानांनी सांगितले. त्यांनी आपल्या जाहीर भाषणांतही हा सल्ला रामाणेंना दिला.

आमचं वाटोळे होते..
सरकार कोणाचे असो, पहाट आमची होवो, अशी जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांची ‘तोंडे’ एकाच बाजूला असावीत, अन्यथा आमचे वाटोळे होते, असे सर्व पक्षांच्या नेत्यांकडे पाहत पाटेकर यांनी टोला लगावताच प्रचंड हशा पिकला. ते म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिले, पण ते तळागाळापर्यंत पोहोचले नाही.
आत्महत्या षंढाचे लक्षण..
पाटेकर म्हणाले, अनेक संघर्ष करीत मी इथंपर्यंत पोहोचलो आहे. अनेकवेळा फुटपाथवर झोपलोही. दहा-पंधरा रुपयांत दिवस काढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता अडचणींना सामारे जावे. आत्महत्या करणे हे षंडपणाचे लक्षण आहे म्हणून अडचणीतील शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम नाम फौंडेशन करीत आहे.

कधी-कधी चांगली कामे
आमदार सतेज पाटील यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमास अभिनेते नाना पाटेकर यांना आणून चांगले काम केले आहे.‘बंटी कधी-कधी चांगली कामे करतो’ असे आमदार हसन मुश्रीफ यांनी टोला लगावता हशा पिकला.


माईकमध्ये बिघाड..
अगदी नाना पाटेकर नाट्यगृहात आगमनाच्या अगोदरपर्यंत माईक टेस्टिंग सुरूच होते तर नाना बोलण्यास उभे राहिल्यानंतरही माईक बंद पडला आणि पुन्हा सुरूही झाला. त्याची चर्चाही उपस्थितांमध्ये जोरदारपणे सुरू होती.

Web Title: Why do not the farmers have any reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.