राष्ट्रीय सणांमध्ये महिलांचा सहभाग का नाही? ध्वजवंदनास नगण्य उपस्थिती :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:10 AM2018-08-12T00:10:35+5:302018-08-12T00:11:17+5:30
गणपती, दसरा, दिवाळीपासून ते म्हाईपर्यंतच्या सणांमध्येच गुंतलेल्या महिलांचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांमध्ये मात्र नगण्य सहभाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशाच्या राजकीय, सामाजिक सुधारणांत मोलाचे योगदान देणारी
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : गणपती, दसरा, दिवाळीपासून ते म्हाईपर्यंतच्या सणांमध्येच गुंतलेल्या महिलांचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांमध्ये मात्र नगण्य सहभाग आहे. स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशाच्या राजकीय, सामाजिक सुधारणांत मोलाचे योगदान देणारी महिला आघाडी ध्वजवंदनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमात मात्र पिछाडीवर आहेत. मीदेखील या राष्ट्राचा एक घटक आहे, या अभिमानातून महिलांनी एक दिवस तरी राष्ट्रध्वजाला सलाम करणे ही नैतिक, सामाजिक जबाबदारी आहे.
आपण भारतीय उत्सवप्रिय लोक. येथील संस्कृती आणि लोकजीवनाला सण, उत्सव आणि समारंभाच्या रंगांनी अधिक खुलवले आहे. या सणांच्या तयारीत आघाडी असते ती महिलांची. उत्सव एक दिवसाचा असो नाहीतर दहा-बारा दिवसांचा. महिलांचे भावविश्व त्याभोवती गुंफले आहे; पण १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण साजरे करताना मात्र महिला दिसतच नाहीत.
शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, पतसंस्था, बँका, ग्रामपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद अशा आस्थापनांमध्ये ध्वजवंदन सोहळ्याला उपस्थित राहणे बंधनकारक आहे; त्यामुळे याठिकाणी महिला अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य महिलांची उपस्थिती असते. याशिवाय राजकीय, सामाजिक जीवनात कार्यरत असलेल्या महिलांना या दिवसाचे महत्त्व माहीत असते; त्यामुळे त्यांचीही ध्वजवंदनाला उपस्थिती असते.अशा विविध क्षेत्रांतील मोजक्या आणि सुशिक्षित महिला वगळता युवती, गृहिणी अगदी भागाभागांतील, गल्ली किंवा चौकांतील ध्वजवंदन सोहळ्यालादेखील उपस्थित नसतात, हे खेदजनक वास्तव आहे.
लढवय्या इतिहासाचा विसर..
पुरुषप्रधान मानसिकतेच्या काळातही अनेक महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले होते. देशाला किती मोठ्या संघर्षानंतर हे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यात स्त्रीशक्तीचे योगदान किती मोलाचे होते याबद्दल महिलांनाच माहिती नाही. राष्ट्रीय सण महिलांनीदेखील साजरे करणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव महिलांमध्ये नाही. त्यासाठी आता त्यांचे प्रबोधन आणि जाणीवजागृती निर्माण करण्याची गरज आहे.
मानसिकतेचा पगडा
पुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेमुळे पूर्वीच्या काळी महिला घराबाहेर पडत नसत. त्यात सार्वजनिक कार्यक्रमांना त्यांनी जायचेच नाही हा एक अलिखित नियम त्यांच्या माथी होता. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण सार्वजनिकरीत्या साजरे केले जात असल्याने अजूनही महिलांची त्यात आपला सहभाग हवा अशी मानसिकता नाही.
सुशिक्षित नोकरदार महिलांमध्ये स्वातंत्र्यदिनाबद्दलची जाणीवजागृती आहे; पण समाजातला मोठा घटक असलेल्या युवती आणि गृहिणींमध्ये अजूनही राष्ट्रीय सणांबद्दल प्रबोधन करण्याची गरज आहे. सार्वजनिकरीत्या साजरा होणाऱ्या या राष्ट्रीय सणांमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.
- प्रा. डॉ. भारती पाटील राज्यशास्त्राच्या अभ्यासक
महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाचा सर्वांनाच विसर पडला आहे. किती कष्टाने हे स्वातंत्र्य मिळाले, याची जाणीव नाही. त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. देवाला रोज हात जोडता, त्याप्रमाणे ध्वजाचेही दर्शन घ्यायला हवे.
- सरलाताई पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्या
देशाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा केवळ पुरुषच स्वतंत्र झाले का असा प्रश्न पडतो. त्यांना अजुनही आर्थिक, वैचारिक आणि संचाराचे स्वातंत्र्य नाही. देवधर्म, उपवास, व्रतवैकल्ये, सण-वार यात दिवसेंदिवस स्वत:ला गुंतवून घेतलेल्या महिलांनी एक दिवस तरी तिरंग्याला सलाम करावा, अशी अपेक्षा आहे.
- सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या