कृषी महाविद्यालयास ‘शाहूं’चे नाव देण्याचे वावडे का ?

By admin | Published: June 26, 2015 12:48 AM2015-06-26T00:48:32+5:302015-06-26T00:48:32+5:30

दीड वर्षानंतरही प्रलंबीत : नाव देण्याची घोषणा हवेतच

Why do you want to name the name of 'Shahu' to the agricultural college? | कृषी महाविद्यालयास ‘शाहूं’चे नाव देण्याचे वावडे का ?

कृषी महाविद्यालयास ‘शाहूं’चे नाव देण्याचे वावडे का ?

Next

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्याची घोषणा तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती. या घोषणेला दीड वर्ष होऊनसुद्धा कृषी महाविद्यालयाच्या नामकरण सोहळ्यास काही मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत कोणत्याही राजकीय नेत्यांकडून किंवा प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा होत नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. असे असताना फक्त येथील प्रवेशद्वाराला राजर्षी शाहूंचे नाव देऊन प्रशासनाला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
२४ नोव्हेंबर २०१३ रोजी महाविद्यालयातील विस्तारित परीक्षा कक्ष, पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृहाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे कोल्हापुरात आले होते. कोल्हापूर जिल्ह्णाची ओळख राजर्षी शाहू महाराजांनी ‘शेतीप्रधान जिल्हा’ म्हणून करून दिली होती. त्या राजर्षी शाहू महाराजांचे नाव कृषी महाविद्यालयास देणे म्हणजे राज्य शासनाचा सन्मान आहे. ‘येत्या दोन महिन्यांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कृषी महाविद्यालयाचा नामकरण सोहळा पार पडेल,’ असे कृषिमंत्री विखे-पाटील यांनी त्यावेळी जाहीर केले होते. घोषणा होऊन दोन महिने झाले, सहा महिने झाले आणि आता तब्बल दीड वर्ष पूर्ण झाले तरी नामकरण सोहळा न झाल्याने सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ‘शासकीय काम आणि दीड वर्ष थांब’ यांची प्रचिती पुन्हा एकदा आली. राज्यातील आघाडी सरकार जाऊन भाजप-शिवसेनेची सत्ता आली आहे. राजर्षी शाहूंच्या नगरीत शाहूंची उपेक्षा होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत असून लवकरात लवकर कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाचे नामकरण करून ‘छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

नावाबद्दल गोंधळ
कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय’ असे नाव आहे. मात्र कृषी महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसह सर्व कागदोपत्री ‘कृषी महाविद्यालय, कोल्हापूर’ असे नाव आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये या नावाबद्दल प्रचंड गोंधळ आहे. हा गोंधळ कुठेतरी थांबून तत्काळ या कृषी महाविद्यालयाला ‘छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय’ असे नाव द्यावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.




कोल्हापुरात १९६३ मध्ये कृषी महाविद्यालयाची स्थापना झाली. महाविद्यालय सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा केला. स्थापनेवेळी फक्त ६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे सात संशोधन केंद्रेही आहेत. आतापर्यंत महाविद्यालयातून ७ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी पदवी घेतली आहे.

कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयाचे ‘छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्याबाबतचा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाठविला आहे.
- राजेंद्र भुजबळ, सहायक कुलसचिव, कृषी विद्यापीठ

Web Title: Why do you want to name the name of 'Shahu' to the agricultural college?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.