सगळ्यांचा आवाज का दाबताय?; महापालिका सभेत विरोधकांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:22 AM2020-01-31T11:22:14+5:302020-01-31T11:24:16+5:30
. पैसा महत्त्वाचा आहे. तो सुशोभीकरण किंवा वाहतुकीच्या व्यवस्थापनाच्या नावाखाली वायफळ खर्च होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. निकम या अजेंड्यावरील विषयांना विरोध करीत आहेत, असा समज झालेल्या शारंगधर देशमुख यांनी ‘विषय भलतीकडे नेऊ नका, नेमका विषय काय आहे तो आधी समजून घ्या,’ अशी विनंती केली.
कोल्हापूर : महापालिकेच्या विशेष सभेत सत्यजित कदम, रूपाराणी निकम, किरण नकाते यांना बोलण्याची परवानगी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी आघाडीच्या सदस्यांनी गुरुवारी ‘आमच्या सगळ्यांचा आवाज का दाबताय?’अशी थेट विचारणा करीत सभात्याग केला. यावेळी सत्तारूढ व विरोधी गटांच्या सदस्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.
गुरुवारी महापालिकेची विशेष सभा पार पडली. या सभेत अंतर्गत गॅसवाहिनी, वाहतूक उपाययोजना, लाईट शो, महापालिका शाळांतील पायाभूत सुधारणा अशा चार विषयांवर चर्चा झाली. चर्चेवेळी विरोधी गटाच्या रूपाराणी निकम यांनी हरकत घेत शहरातील नागरिकांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन कामे करावीत. पैसा महत्त्वाचा आहे. तो सुशोभीकरण किंवा वाहतुकीच्या व्यवस्थापनाच्या नावाखाली वायफळ खर्च होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. निकम या अजेंड्यावरील विषयांना विरोध करीत आहेत, असा समज झालेल्या शारंगधर देशमुख यांनी ‘विषय भलतीकडे नेऊ नका, नेमका विषय काय आहे तो आधी समजून घ्या,’ अशी विनंती केली. त्यातून वादावादीला सुरुवात झाली. ‘आम्ही सुशोभीकरण करून पैसे वाऱ्यावर घालवत नाही. तो योग्य पद्धतीने खर्च होईल.
मात्र गेल्या पाच वर्र्षांत पैसा कोठे गेला हे आम्हाला कळले नाही,’ असा टोमणा देशमुख यांनी लगावला. त्यावेळी किरण नकाते, सत्यजित कदम यांनी निकम यांची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न केला. दोघे काही बोलत असताना महापौर लाटकर यांनी दोघांनाही खाली बसण्याचा आदेश दिला. ‘एकेकटे बोला, एकदम सगळ्यांनी बोलण्याचा प्रयत्न करु नका,’ असेही त्यांनी सुनावले. सभा कामकाजाच्या इतिवृत्तात तुमचे म्हणणे येणार नाही, असाही आदेश महापौरांनी संबंधित लघुलेखकांना दिला. यावेळी कदम, देशमुख व नकाते यांच्यात खडांजगी उडाली.
त्यामुळे विरोधी सदस्य संतप्त झाले. ‘आमच्या सगळ्यांचा आवाज तुम्ही का दाबता आहात, आम्ही योग्य बोलण्याचा प्रयत्न करत असताना बोलू देत नाही. महापौरांची कृती बरोबर नाही,’ अशा शब्दांत विरोधी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. पाठोपाठ विरोधी गटाच्या सर्वच सदस्यांनी महापौरांच्या कृतीचा निषेध म्हणून सभात्याग केला.
गॅस वाहिनीसंदर्भात प्रशासकीय प्रस्ताव द्या
शहरातून गॅसवाहिनी टाकण्याच्या तसेच त्या संदर्भातील खुदाईचे दर ठरविण्याचा सदस्य ठराव सभेच्या अजेंड्यावर होता. त्यावर गटनेते शारंगधर देशमुख यांनी प्रशासनाने अभ्यास करून परिपूर्ण प्रस्ताव महासभेसमोर सादर करा, अशी सूचना केली. सत्यजित कदम यांनी मात्र प्रशासनावर आमचा काडीमात्र विश्वास नाही. खुदाई केल्यानंतर ठेकेदार ते बुजवत नाहीत. अमृत योजनेचा अनुभव ताजा आहे. खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोण घेणार हे स्पष्ट झाल्याशिवाय ठराव करू नका, असे सांगितले. पाठोपाठ राहुल चव्हाण यांनीही भूमिगत गॅसवाहिन्या आम्हाला नकोत असे सांगितले. शारंगधर देशमुख त्यामुळे चिडले. प्रशासकीय प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करू, असे सांगून त्यांनी वादावर पडदा टाकला.
थोरात दाम्पत्य करणार शाळांना मदत
महापालिकेच्या शाळेत पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता लागणारा निधी व तज्ज्ञ मनुष्यबळ लोकसहभागातून उभारण्यात येणार असून ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात व त्यांच्या पत्नी रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात याबाबत मदत करणार असल्याचे महापौर अॅड. लाटकर यांनी सभेत सांगितले. यावेळी अशोक जाधव, विजय खाडे-पाटील यांनी लोक मदत करायला तयार आहेत. मात्र त्यासाठी पाठपुराव्यात सातत्य राखावे, असे आवाहन केले.