इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधून कोल्हापूरला का वगळले ?
By admin | Published: March 8, 2016 12:19 AM2016-03-08T00:19:41+5:302016-03-08T00:53:02+5:30
सतेज पाटील : सांगली-सातारा-सोलापूरचा समावेश
कोल्हापूर : मुंबई-बंगलोर औद्योगिक कॉरिडॉरमधून वगळून भाजप सरकारने कोल्हापूरवर अन्याय केला आहे. या कॉरिडॉरमध्ये सांगली, सातारा व सोलापूरचा समावेश करण्याबाबत शिफारस केल्याचे टिष्ट्वट मुख्यमंत्री कार्यालयाने केले आहे. त्यामुळे भाजप सरकारला कोल्हापूरचे वावडे आहे का, अशी विचारणा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
कोल्हापूरमध्ये गोकुळ शिरगाव, शिरोली, कागलसारख्या औद्योगिक वसाहती असल्याने या परिसराचा विकास व्हावा या हेतूने काँग्रेस सरकारने या कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश केला होता. हा मूळ कॉरिडॉर मुंबई, सातारा, कोल्हापूर, बंगलोर असा होता. त्यामध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. डिसेंबर २०१३ मध्ये या संदर्भात कोल्हापुरातील उद्योजकांची आपण बैठकही घेतली होती; परंतु तकलादू कारण पुढे करीत हा कॉरिडॉर कोल्हापूरऐवजी इतर शहरांतून नेण्याचा घाट भाजप सरकारने घातला. त्याबाबत सरकारचा जाहीर निषेध केला. आता मात्र सरकारने ‘यू टर्न’ घेत चारपैकी फक्त कोल्हापूरला वगळून अन्य तीन शहरांचा कॉरिडॉरमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे. सरकारमधील लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याची टीका आमदार पाटील यांनी केली आहे.