हवामानाचा अंदाज का चुकतो? --दृष्टीक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:26 AM2019-09-24T00:26:47+5:302019-09-24T00:27:41+5:30
भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून चेरापुंजीची ओळख आहे. मात्र ही ओळख यंदा महाबळेश्वरने पुसून टाकली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात होणा-या बदलामुळे पाऊस कमी जास्त होत आहे.
- चंद्रकांत कित्तुरे
म हापुराच्या संकटातून सावरत असतानाच आता विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे राजकीय नेते, कार्यकर्ते, तज्ज्ञ यांच्यासाठी सध्या सुगीचा हंगाम सुरू झाला आहे. पावसाळ्याचा हंगाम अद्याप संपला नसला तरी परतीच्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. आणखी एका चक्रीवादळाचे संकट मुंबईजवळ अरबी समुद्रात घोंगाऊ लागले आहे. त्याने जर किनारपट्टीला तडाखा दिला, तर पुन्हा जोरदार वारे, तुफानी पाऊस होण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम म्हणून महाराष्टÑात अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. मात्र, हे वादळ किनारपट्टीवर धडकेल काय? त्याचा परिणाम म्हणून कुठे, कुठे पाऊस होईल, हे ठामपणे भारतातील कोणतीही वेधशाळा सांगू शकत नाही. प्रत्येक अंदाजापुढे शक्यता हा शब्द लावलेला असतो, असे का होते?
युरोप, अमेरिकेतील विकसित देशांत पाऊस कधी पडणार? किती पडणार याचे अचूक अंदाज सांगितले जातात. या अंदाजावरच तेथील नागरिक आपले दैनंदिन व्यवहार, प्रवास करीत असतात. आपल्याकडे मात्र हवामानाचा अंदाज म्हणजे जो कधीही खरा ठरत नाही तो, असे उपहासाने म्हटले जाते. विकसित देशात अचूक अंदाज सांगता येतो, मग आपल्याला का नाही सांगता येत? असा प्रश्न सर्वसामान्यांपासून बहुतेक सर्वांनाच पडतो. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न मात्र कुणी करताना दिसत नाही. एकतर विकसित देश आकाराने लहान आहेत. शिवाय त्यांनी हवामान संशोधन, पर्जन्यमापन केंद्राचे जाळे उभारले आहे. साधारणपणे पाच किलोमीटरच्या आत एक हवामान, पर्जन्यमापन केंद्र असते. शिवाय तेथील यंत्रणा अत्याधुनिक असते. त्यामुळे तेथील वेधशाळेला किंवा हवामानतज्ज्ञांना हवामानाचा अचूक अंदाज सांगता येतो. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवेळी कोणत्या सामन्यावर पावसाचे पाणी फिरणार याचा अंदाज दहा, पंधरा दिवस आधीच देण्यात येत होता. तो बऱ्यापैकी खरा ठरत होता. अचूक हवामान अंदाज देता येण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या देशात भारतासारखे भौगोलिक वैविध्य नाही. त्यामुळे वातावरण सर्वत्र सारखे राहू शकते, असे या विषयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरला गेलो होतो. तेथे हवामान संशोधन केंद्र आहे. कोट्यवधीची अत्याधुनिक यंत्रसामुग्री या केंद्रात बसविण्यात आली आहे.
२०१४ मध्ये हे केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राची माहिती घेतल्यानंतर, तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्याकडील हवामानाचे अंदाज अचूक का येत नाहीत हे कळले. महापुराच्या काळात जो विक्रमी पाऊस झाला त्याचा अंदाज जर आधीच वर्तविता आला असता तर पाणी सोडण्याचे पूर्वनियोजन करून महापुराची तीव्रता कमी करता आली असती. आपणही पावसाचा अचूक अंदाज सांगू शकतो मात्र, त्यासाठी प्रत्येक पाच किलोमीटरवर पर्जन्यमापक यंत्र हवे, हवामान संशोधन केंद्रांची संख्या वाढायला हवी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणायला हवे, मुळात यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, प्रतापगडासह सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाळ्यात जोरदार पाऊस होतो. अरबी समुद्रावरून येणारे मान्सूनचे वारे या पर्वतरांगामध्ये अडते आणि पर्जन्यवृष्टी होते.
कोल्हापूर जिल्ह्यातही राधानगरी, शाहूवाडी, आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यांतही असाच पाऊस पडतो, मात्र तुलनेने महाबळेश्वर परिसरात पडणारा पाऊस विक्रमी असतो. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून चेरापुंजीची ओळख आहे. मात्र ही ओळख यंदा महाबळेश्वरने पुसून टाकली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात होणा-या बदलामुळे पाऊस कमी जास्त होत आहे. कधी तो गायबच होतो. कधी आला तर तो असा येतो की जणू ढगफुटीच! त्यामुळे शासन, प्रशासनाचे नियोजनही कोलमडून पडते आहे. चालू वर्षाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. अल निनो सक्रिय असल्यामुळे पाऊस गायब झाला असल्याचे सांगितले जात होते. मात्र, जुलैमध्ये अल निनोचा प्रभाव नाहीसा झाला आणि मान्सूनने दक्षिण महाराष्टत जोर लावला तो इतका की चार पाच दिवसांतच नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लगले. पाच आॅगस्टनंतर कोल्हापुरात महापुराची परिस्थिती निर्माण झाली. तब्बल आठ-दहा दिवस महापुराने जिल्ह्यात ठिय्या दिला. लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले. अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेची आणि शेतातील पिकांची हानी झाली. या महापुरातून अद्यापही पूरग्रस्त अद्याप पुरेसे सावरलेले नाहीत. ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत ते घरबांधणीसाठी सरकार कधी हात देणार? पाच हजार रुपये रोख मिळाले. पुढचे दहा हजार खात्यावर कधी जमा होणार? रेशनवर प्रत्येक पूरग्रस्ताला मोफत धान्याची घोषणा झाली होती. या महिन्यात ते अद्याप मिळाले नसल्याच्या पूरग्रस्तांच्या तक्रारी आहेत. सरकार आणि यंत्रणा आता निवडणुकीच्या धामधुमीत आहे. पूरग्रस्तांचे पुनर्वसन किंवा मदत यात कुठेही अडथळा येणार नाही. ते चालूच राहील, असे सांगण्यात येत असले तरी निवडणूक काळात यासाठी यंत्रणेला वेळ मिळणार आहे का? यावरच त्याचे उत्तर अवलंबून असणार आहे.