कागलच्या ‘त्या’ ठेकेदारावर फौजदारी का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:14+5:302021-06-03T04:18:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकलेल्या कागल तालुक्यातील ‘त्या’ ठेकेदाराला केवळ चार महिन्यांत पुन्हा कंत्राट ...

Why not criminalize ‘that’ contractor of Kagal | कागलच्या ‘त्या’ ठेकेदारावर फौजदारी का नाही

कागलच्या ‘त्या’ ठेकेदारावर फौजदारी का नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकलेल्या कागल तालुक्यातील ‘त्या’ ठेकेदाराला केवळ चार महिन्यांत पुन्हा कंत्राट कसे दिले गेले आणि अधिकाऱ्याची बोगस सही करणाऱ्या याच ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी बुधवारी केली. संबंधित ठेकेदार राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे. शिवाय कागल तालुक्यातीलच काही गावातील लोकांनी हा ठेकेदार नको म्हणून भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय दृष्ट्याही हा विषय तापण्याची शक्यता आहे.

निंबाळकर यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहिले असून, दुसऱ्या पत्राद्वारे त्यांनी जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन सभेचे चित्रीकरणही मागवले आहे. कागल तालुक्यातील ज्या ठेकेदाराने अधिकाऱ्याची बोगस सही केली. त्या ठेकेदाराला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले होते. मार्च २० मध्ये त्याला तसे पत्र दिले असताना लगेचच चार महिन्यात त्याच आदेशाला स्थगिती देऊन पुन्हा त्याला कागल तालुक्यातील कामे कशी दिली गेली, अशी विचारणा निंबाळकर यांनी लेखी पत्रात केली आहे. या ठेकेदाराच्या कागल तालुक्यातील सर्व कामांची चौकशी करून मगच बिल अदा करावे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

मंगळवारी जिल्हा परिषदेची ऑनलाइन सभा झाली. यावेळी अनेक वेळा झालेली चर्चा ऐकूही येत नव्हती. या पार्श्वभूमीवर ज्या विषयांबाबत फारशी चर्चाच झालेली नाही ते ठराव होऊ नयेत, याची दक्षता म्हणून निंबाळकर यांनी ही मागणी केली आहे, तसेच कुस्तीच्या मटची खरेदी, ७४५ शिक्षकांना आगावू वेतनवाढ, संवर्ग १ शिक्षकांच्या बदल्या डावलून इतर संवर्गाच्या बदल्या याबाबत सभागृहामध्ये चर्चा होऊनही प्रत्यक्षात मात्र काही कारवाई झालेली नाही. याबाबत केलेल्या कारवाईचीही लेखी मागणी निंबाळकर यांनी केली आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने ९ शिक्षकांना केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती दिली आहे. त्यासंबंधीची कागदपत्रेही निंबाळकर यांनी मागितली आहेत. त्यामुळे वरील सर्व विषयांवरूनही यापुढच्या काळात वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Why not criminalize ‘that’ contractor of Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.