बोगस कुस्ती मॅटबाबत गुन्हा का दाखल केला नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:44 AM2019-08-29T10:44:53+5:302019-08-29T10:46:34+5:30
तक्रार होऊन काही महिने झाले. तुम्ही शिंगणापूर शाळेतील बोगस कुस्ती मॅटबाबत कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही? असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना केला.
कोल्हापूर : तक्रार होऊन काही महिने झाले. तुम्ही शिंगणापूर शाळेतील बोगस कुस्ती मॅटबाबत कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा का दाखल केला नाही? असा संतप्त सवाल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना केला.
स्थायी समितीची सभा बुधवारी दुपारी समिती सभागृहात झाली. यामध्ये या विषयावर अर्धा तास घमासान झाले. अखेर उबाळे यांनी ‘फौजदारी गुन्हा दाखल करते,’ असे सांगितल्यानंतर या विषयावर पडदा पडला.
बैठकीदरम्यान महाडिक यांनी स्वत: कुस्ती मॅटबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तुम्ही श्ािंगणापूर शाळेत गेला का? मॅटची पाहणी केली का? तो दर्जा तुम्हाला योग्य वाटला का? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत महाडिक यांनी ‘गुन्हा का दाखल केला नाही?’ अशी विचारणा केली. सदस्य राहुल आवाडे यांनीही ‘तुम्ही आतापर्यंत गप्प का बसलात?’ असे विचारले.
सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी दुरुत्तरे करणाऱ्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक ए. आर. जाधवर यांना निलंबित केल्याशिवाय पुढच्या सर्वसाधारण सभेला बसणार नसल्याचे यावेळी सांगितल्यानंतर त्यांना निलंबित करण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अमन मित्तल यांनी दिली.
यावेळी मित्तल यांनी पुराच्या काळात जिल्हा परिषदेचे ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगून त्याबाबतचे सविस्तर सादरीकरण केले. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत असून तातडीने डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी गटनेते अरुण इंगवले यांनीही चर्चेत भाग घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेकडे नव्याने रुजू झालेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे आणि निरंतर शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांचे स्वागत करण्यात आले.
बैठकीला उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती अंबरीश घाटगे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, वंदना मगदूम, सदस्य जयवंतराव शिंपी, युवराज पाटील, कल्लाप्पा भोगण, संध्याराणी बेडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी स्वागत केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.