शिवाजी विद्यापीठाची ‘सीएचबी’कडे वाटचाल कशाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 04:43 PM2021-12-21T16:43:41+5:302021-12-21T16:44:12+5:30
या हंगामी शिक्षकांना समान काम समान वेतन तत्त्वानुसार पाहता सध्या मिळणारे वेतन कमी आहे.
कोल्हापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना कायमस्वरूपी प्राध्यापक भरती त्वरित करा म्हणून आदेश दिले आहेत. त्याबाबत राज्य शासनाशी पत्रव्यवहार केला आहे. शासनाने देखील ४० टक्के नोकरभरती सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. अशा स्थितीत शिवाजी विद्यापीठाची पुन्हा तासिका तत्त्वावरील (सीएचबी) शिक्षक नियुक्तीकडे वाटचाल कशाला हवी, अशी विचारणा विद्यापीठाच्या घटकातून होत आहे. सीएचबी तत्त्वानुसार शिक्षक नेमल्यास गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होऊ असून त्याऐवजी पूर्णवेळ शिक्षक नेमण्याचा सर्वांनी आग्रह धरला पाहिजे, अशी मागणी या घटकांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची (सिनेट) बैठक झाली. त्यात विद्यापीठातील हंगामी शिक्षकांच्या वेतनावरील आर्थिक बोजा विद्यापीठाच्या स्वनिधीवर पडत असून, सीएचबी तत्त्वानुसार शिक्षक नियुक्तीच्या मुद्दावर चर्चा झाली. शासनाच्या पातळीवरून प्राध्यापक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची कमतरता पूर्ण करणे महाविद्यालय, विद्यापीठांना अडचणीचे ठरत आहे. ती कमतरता विद्यापीठ हंगामी शिक्षकांची नियुक्ती करून पूर्ण करत आहे.
या हंगामी शिक्षकांना समान काम समान वेतन तत्त्वानुसार पाहता सध्या मिळणारे वेतन कमी आहे. या शिक्षकांनी विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत चांगले योगदान दिले आहे. त्यांच्या माध्यमातून विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित विभागांचे काम सुरू आहे. अशा स्थितीत सीएचबी तत्त्व स्वीकारल्यास शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने विविध प्रश्न निर्माण होणार असल्याचे मत विद्यापीठाच्या घटकांतून व्यक्त होत आहे.
‘सीएचबी’धारकांवर मर्यादा
सीएचबी तत्त्वावरील शिक्षकांचा विचार करता त्यांना काम करताना अनेक मर्यादा येतात. त्यांनी नेमून दिलेल्या तासात काम करावे लागते. हे शिक्षक विद्यापीठाच्या इतर कोणत्याही कामासाठी बांधील नसतात. विद्यापीठाने सीएचबीचे धोरण स्वीकारल्यास विद्यार्थ्यांची परीक्षा, प्रवेश, संशोधनाबाबत विविध प्रश्न निर्माण होणार असल्याचे मत विद्यापीठाच्या काही घटकांनी व्यक्त केले.
विद्यापीठ कार्यक्षेत्रात १५९२ जागा रिक्त
शिवाजी विद्यापीठातील अनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित अधिविभागांमध्ये एकूण २४७, तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत गेल्या चार वर्षांपासून सहायक प्राध्यापकांची १२९८ पदे, तर प्राचार्यांची ४७ पदे रिक्त आहेत.
पूर्णवेळ शिक्षक नियुक्तीची आवश्यक असताना विद्यापीठाने सीएचबी तत्त्वावर शिक्षक नियुक्ती करणे योग्य ठरणार नाही. शिक्षकांच्या रिक्त जागांवर पूर्णवेळ भरती होईपर्यंत हंगामी तत्त्वाने शिक्षकांची नियुक्ती विद्यापीठाने करावी. -प्रा. सुभाष जाधव, माजी उपाध्यक्ष, एमफुक्टो