जरांगेंशी चर्चा करायला चंद्रकांतदादांना का पाठवलं नाही?, मराठा आंदोलकांचा भाजप पदाधिकाऱ्यांना सवाल
By समीर देशपांडे | Published: November 1, 2023 12:54 PM2023-11-01T12:54:07+5:302023-11-01T12:56:23+5:30
कोल्हापूर : मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला चंद्रकांत पाटील या मराठा मंत्र्यांना न पाठवता बिगर मराठा मंत्री गिरीश ...
कोल्हापूर : मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला चंद्रकांत पाटील या मराठा मंत्र्यांना न पाठवता बिगर मराठा मंत्री गिरीश महाजन यांना का पाठवले असा सवाल सकल मराठा समाज आंदोलकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विचारला.
आज, बुधवारी सकाळी ब्राह्मण समाज, भाजप पदाधिकारी आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दसरा चौकातील मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यावेळी हा सवाल विचारण्यात आला.
या आंदोलनाला पाठिंबा देणारे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे भाषण झाल्यानंतर बाबा इंदूलकर यांनी चंद्रकांत पाटील यांना चर्चा करायला पाठवले असते तर एक मराठा दुसऱ्या मराठ्याशी बोलला असता. मार्ग निघाला असता. परंतू ते सोडून बिगर मराठा महाजन यांना का पाठवले.
यावर महेश जाधव यांनी आम्ही तसा ‘निरोप’ देतो असे सांगितले. तर विजय जाधव यांनी भाजपने कधीही मराठा समाजावर अन्याय केला नाही. उलट पाटील यांना सात खात्यांचे मंत्री केले होते असे स्पष्ट केले. यावेळी ब्राम्हण समाजाच्यावतीने अॅड. राजेंद्र किंकर आणि अॅड. विवेक शुक्ल यांनी पाठिंबा दिला.