पुणे-कोल्हापूर महामार्ग रुंदीकरणाने सारेच बेहाल, टोलच रद्द करण्याची मागणी 

By समीर देशपांडे | Published: June 10, 2024 05:49 PM2024-06-10T17:49:41+5:302024-06-10T17:51:12+5:30

पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण हे प्रवाशांचा अंत पाहणारे ठरत आहे.

Widening of Pune-Kolhapur highway will cause all problems, demand to cancel only tolls | पुणे-कोल्हापूर महामार्ग रुंदीकरणाने सारेच बेहाल, टोलच रद्द करण्याची मागणी 

पुणे-कोल्हापूर महामार्ग रुंदीकरणाने सारेच बेहाल, टोलच रद्द करण्याची मागणी 

समीर देशपांडे

कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण हे प्रवाशांचा अंत पाहणारे ठरत आहे. सुमारे १०० हून अधिक असणारी दोन्ही बाजूंची डायव्हर्जन्स, त्यातील अशास्त्रीयपणा, कसेही काढण्यात आलेले सर्व्हिस रोड यामुळे वाहनधारक अक्षरश: हैराण झाले असून, जोपर्यंत काम पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोलच रद्द करण्याची मागणी होत आहे.

गेली दोन वर्षे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे सहापदरीकरण सुरू आहे. त्यामध्ये नवे पूल, जुन्या पुलांची दुरुस्ती, नवे सेवा रस्ते मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे सहापदरीकरण करणे आवश्यक आहेच. परंतु ते करताना सध्याचा प्रवास हा किमान सुसह्य व्हावा, यासाठी प्राधिकरण आणि ठेकेदार काहीच काळजी घेणार नसतील तर मग त्यांना विचारणारे कोणी आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

येता-जाता असणारी १०० डायव्हर्जन्स आणि रस्ता रुंदीकरणामुळे यापूर्वीच्या चौपदरी रस्त्यावर वापरावयास शिल्लक असणारा भीतीदायक एकल मार्ग, रस्ता समपातळीत नसणे, त्यातच पडलेले खड्डे, अशास्त्रीय अडथळे यामुळे प्रवाशांना या मार्गावरचा प्रवास नकोसा झाला आहे. प्रवासी जीव मुठीत घेऊन दोन तास विलंबाने हा प्रवास करून आपल्याच नशिबाला दोष देत असल्याचे दिसून येत आहे.

सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी, वेळेची बचत व्हावी, यासाठी नागरिक टोल भरत असताना या सेवाच सध्या सहापदरीकरणाच्या कामावेळी मिळत नसतील तर काम पूर्ण हाेईपर्यंत टोलच रद्द करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

वाहनधारकांनी सांगितलेले दोष

  • वाट्टेल तसे आडवे येणारे गर्डर
  • धोकादायक सेवा रस्ते
  • अचानक समोर येणारी डायव्हर्जन्स
  • ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण त्या ठिकाणी अचानक उलट मार्गाने येणाऱ्या चारचाकी


कोल्हापूर-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अतिशय धोकादायक पद्धतीने सुरू आहे. महामार्ग प्राधिकरणाला कोणीच जाब विचारत नसल्याने त्यांच्या पद्धतीने काम सुरू आहे. धोकादायक आणि वेळखाऊ प्रवास असून, केवळ अपघातात कोणाचे जीव जात नाहीत म्हणून या मार्गावरील धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष सुरू आहे. -समीर परुळेकर, कोल्हापूर
 

किमान दीड ते दोन तास विलंबाने धावणाऱ्या वाहनधारकांकडून वसूल करण्यात येणारा कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलचा झिझिया कर म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ असेच काहीतरी आहे. वाहनधारक टोल देऊन प्रवासाला कमी कालावधी लागेल आणि कोणताही अपघात किंवा अडथळ्याशिवाय प्रवास होईल, या अपेक्षेने रस्ता वापरतात; पण या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल माफ करावा किंवा वाहतुकीचे योग्य नियोजन करावे. तिऱ्हाईत यंत्रणेकडून निविदा वाचून या कामाची तपासणी होण्याची गरज आहे. -दौलत देसाई, माजी जिल्हाधिकारी, कोल्हापूर

Web Title: Widening of Pune-Kolhapur highway will cause all problems, demand to cancel only tolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.