बाजारभोगाव ते पडसाळी रस्त्याचे होणार रुंदीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:39+5:302021-04-25T04:24:39+5:30
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव - काऊरवाडी - किसरुळ - काळजवडे - पोंबरे - कोलिक - पडसाळीदरम्यानच्या दुर्गम डोंगराळ ...
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव - काऊरवाडी - किसरुळ - काळजवडे - पोंबरे - कोलिक - पडसाळीदरम्यानच्या दुर्गम डोंगराळ वाड्या वस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचे भाग्य खा. संजय मंडलिक यांच्या पाठपुराव्यामुळे उजळणार आहे. केंद्रीय दळवणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी ३ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. आता या निधीतून १० किलोमीटरच्या या रस्त्याचे रंदीकरण होणार आहे.
बाजारभोगाव ते पडसाळीदरम्यानचा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या भागातील वाड्या वस्त्यांमधून शहराच्या ठिकाणी यावयाचे झाल्यास याच रस्त्याचा वापर केला जात आहे. सध्या या रस्त्याची रुंदी ३.७५ मीटर इतकी असल्याकारणाने दोन बाजूंनी मोठी वाहने सहजासहजी ये-जा करता येत नव्हती. त्यामुळे या रस्त्याची रुंदी वाढवावी, अशी मागणी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंडलिक यांनी केंद्र शासनाकडे मागणी केली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत गडकरी यांनी या दहा किमी रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता निधी मंजूर केला असल्याचे पत्र मंडलिक यांना पाठवले आहे.
चौकट ०१
रंदीकरणामुळे रस्ता कोल्हापूर ते अणुस्कुराला मिळणार
रस्त्याची रुंदी ५.५० मीटर इतकी धरण्यात आलेली असून या कामाची निविदा प्रक्रिया राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे व लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम सुरू होणार आहे. हा रस्ता पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १९३ कोल्हापूर ते अणुस्कुरा या रस्त्याला मिळणार असल्याकारणाने या भागातील शेतमाल लवकरात लवकर पोहोचविणे शक्य होणार आहे.