विधवा आहे म्हणून

By admin | Published: June 5, 2015 12:06 AM2015-06-05T00:06:34+5:302015-06-05T00:13:48+5:30

सिटी टॉक

As is the widow | विधवा आहे म्हणून

विधवा आहे म्हणून

Next

मागील आठवड्यात शाहू स्मारक भवनमध्ये मराठा संघटनांच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या विधवाश्रमाद्वारे विधवा महिलांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्याला तुलनेने महिलांची संख्या तशी कमी होती; पण जेवढ्या काही महिला तेथे उपस्थित होत्या, त्यापैकी प्रत्येकीला काही ना काही आशा होती. या मेळाव्यात महिलांनी आपले अनुभव मांडणे अपेक्षित होते. दोन-तीन महिलांनी धाडस केले, विधवा म्हणून जगताना येणारे अनुभव सांगताना त्यांच्या डोळ््यांतून अश्रू येत होते, तरी त्या पहिल्यांदा मन मोकळं करत होत्या. विधवा म्हणून नव्हे, तर एक व्यक्ती म्हणून आम्हाला समानतेने जगण्याचा अधिकार द्या, असे त्या म्हणत होत्या.
मला आठवतंय मी सातवीत आणि मोठी बहीण नववीत असताना माझ्या निवृत्त माजी सैनिक असलेल्या वडिलांचे निधन झाले. पप्पांनी आम्हाला खूप लाडात वाढविले होते. आई घरबसल्या काही तरी छोटे-मोठे काम करायची; पण वडिलांच्या निधनानंतर आम्हा दोघींची सगळी जबाबदारी आईवर आली. त्यात कागदपत्रांच्या घोळामुळे पेन्शनसाठी तीन वर्षे आईला जिल्हाधिकारी कार्यालयात अक्षरश: हेलपाटे मारावे लागायचे. या सगळ््या अडचणींच्या काळात तिने शिवणकाम, वह्या, पुस्तकांचे बायडिंग, उन्हाळी पदार्थांचा व्यवसाय करून आमच्या शिक्षणाची तरतूद केली. आम्हीही तिला मदत करत होतो. पुढे पेन्शनही चालू झाली; पण तीन वर्षांचा खडतर काळ आईने कसा झेलला असेल? त्यात नाही ते टोमणे मारणाऱ्यांचीही संख्या काही कमी नव्हती. आम्ही शिकलो स्वत:च्या पायावर उभे राहिलो; पण त्याची मुळे आईने केलेल्या कष्टात तिने दिलेल्या भक्कम पाठिंब्यावर आधारलेली आहेत.
सोलापूरसारख्या ठिकाणी कार्यक्रमांमध्ये विधवांना फारसे अंतर दिले जात नाही किंवा जीवनशैलीत केवळ विधवा आहे म्हणून वेगळा बदल करावा लागत नाही; पण कोल्हापुरात या रूढीचे प्रमाण खूप जास्त असल्याचे मला गेल्या नऊ वर्षांत जाणवले. म्हणजे विधवा महिलेने गळ््यातल्या माळेतही काळे मणी घालायचे नाहीत, अधिक तर पांढरी साडी नेसायची किंवा रंगाची साडी असली तरी हिरव्या रंगांचा लवलेशही असू नये, हातात बांगड्या घालायच्या नाहीत, कपाळ मोकळंच ठेवायचं. कोणतीही टिकली नाही की गंध नाही. कार्यक्रमांमध्ये फारसं पुढे यायचं नाही. कुणाचे औक्षण करायचे नाही. शुभकार्ये, पूजाविधी करायचे नाहीत. लग्नकार्यात डिझायनर साडी किंवा ब्लाऊज घालायचं नाही. सगळं कसं साधं-साधं राहायचं. त्यांच्यासमोर सुवासिनींचा मान मिरवणाऱ्या बायका मात्र किती सजू किती नको अशा पद्धतीने वावरतात. या नियमांबाहेर काही केलंच, तर महिलाच चारचौघांत नावं ठेवायला मागे पुढे पाहत नाहीत.
आता शहरातल्या विधवा महिला किंवा नोकरदार महिलांना आपल्याकडे पाहण्याचा समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन बदलून या स्वसंरक्षणाच्या उद्देशाने मंगळसूत्र, टिकली वापरतात; पण त्यांनाही नाक मुरडले जाते. आजही आपण अत्यंत मागासलेल्या समाज जीवनात वावरत आहोत. हे मान्यच आहे की, विवाहानंतर स्त्रीचे जीवन पतीभोवती फिरत असते. साता जन्माची साथ देण्याची वचने घेतलेली असतात. अनेक सुख-दु:खाचे क्षण एकत्र जगलेले असतात. अशा व्यक्तीचे अचानक जाणे म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यातून सावरताना, आठवणीतून बाहेर येताना स्त्री खूप खंबीर राहते. विधवा झाली म्हणून तिने सार्वजनिक जीवनाचा त्यागच करावा हा नियम कुठला? तिच्यावर सक्ती करण्याचा अधिकार समाजाला कुणी दिला? विधवा महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत सर्वसामान्य महिलांचा बदलणार नाही तोपर्यंत समाजपरिवर्तन होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे विधवा महिलांनी स्वत:चा आत्मसन्मान राखला पाहिजे आणि त्यांना कुटुंबीयांची साथ मिळाली पाहिजे.
- इंदुमती गणेश

Web Title: As is the widow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.