विधवा प्रथा बंद: हेरवाडचा पॅटर्न राज्यभर राबविणार-हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 12:32 PM2022-05-13T12:32:53+5:302022-05-13T12:34:37+5:30
हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाची राज्यातील मंत्रिमंडळाकडून दखल
कुरुंदवाड : हेरवाड पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यासाठी येत्या ३१ मे रोजी होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीला परिपत्रक काढून हा कायदा अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने गुरुवारी मुंबई येथे बैठक झाली. या नव्या निर्णयामुळे हेरवाड गावाने सुरु केलेल्या या अभियानाला बळ मिळत आहे.
हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामसभेने विधवा प्रथा बंद करण्याच्या क्रांतिकारी निर्णयाची राज्यातील मंत्रिमंडळाकडून दखल घेतली जात आहे. गुरुवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा मुंबई येथे सत्कार केला.
४ मे रोजी झालेल्या गाव सभेत हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदचा ऐतिहासिक ठराव केला आणि या ऐतिहासिक निर्णयाची दखल थेट मंत्र्यांकडून घेतली जात आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही हेरवाड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई येथे बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी विधवा महिला संदर्भात असलेले धोरण अजून अर्धवट आहे. त्यामध्ये बदल करून विधवा महिला प्रथा बंदसाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री ठाकूर यांनी सांगितले.
तर मुश्रीफ यांनी हेरवाड गावाने घेतलेला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे विधवा महिलांना न्याय मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये करण्यासाठी परिपत्रक काढले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.