Kolhapur: चारित्र्याच्या संशयातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पतीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:56 PM2024-06-27T12:56:30+5:302024-06-27T12:57:04+5:30

वठार तर्फ वडगाव येथील घटना : चार दिवसांची झुंज अपयशी

Wife death due to husband's beating due to suspicion of character in Vathar-Vadgaon kolhapur | Kolhapur: चारित्र्याच्या संशयातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पतीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद

Kolhapur: चारित्र्याच्या संशयातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पतीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद

पेठ वडगाव : वठार तर्फ वडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून चार दिवसांपूर्वी खुनी हल्ला करण्यात आलेल्या पत्नीचा आज बुधवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव पोलिसांत पतीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पतीने पत्नीला डोक्यात मसाला वाटण्याचा दगड घालून जखमी केले होते.

आयेशा सलमान पटेल (वय २६, रा. वाठार, ता. हातकणंगले), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती सलमान उमर पटेल यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत अबू गुलाब मुल्ला (रा. तासगाव, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली.

घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुल्ला यांची इचलकरंजीतील मेव्हणी जहारा उमर पटेल यांचा मुलगा सलमान पटेल याचे आयेशा मुल्ला बरोबर २५ डिसेंबर २०१९ मध्ये लग्न झाले होते. दरम्यान, जावई सलमान उमर पटेल, रा. वाठार हा शिरोली एमआयडीसी येथे नोकरीस आहे. लग्न झाल्यापासून उमर हा आयेशाला वारंवार चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. याबाबत तिचे वडील अबू व आई शाकिरा यांनी दोघांनी समजावून सांगितले होते; पण उमरच्या स्वभावात काहीही फरक पडत नव्हता.

शनिवारी (दि.२२) दुपारी सलमान हा कामावरून घरी आला. यावेळी दोघा पती- पत्नीत भांडण झाले. दरम्यान, रात्री १२:३० वाजेच्या सुमारास खोलीत आयेशा मोठ्याने ओरडत होती. अचानक ती बोलायची गप्प झाली, तसेच तिच्या शेजारी मसाला वाटण्याचा दगड पडलेला होता. तिच्या डोक्यातून रक्त येत होते. त्यामुळे नातेवाइकाच्या मदतीने कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, शनिवारी (दि.२२) पहाटे ४ वाजता मेव्हणी जहारा हिने आयेशा बाथरूममध्ये पाय घसरून पडली आहे, असा फोन करून निरोप दिला. तिच्या डोक्याला मार लागल्याचे सांगितले. यावेळी सलमानने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर माहेरचे नातेवाईक तात्काळ सीपीआर रुग्णालयात आले. यावेळी तिला बेशुद्धावस्थेत उपचारार्थ दाखल केल्याचे समजले. यावेळी डॉक्टरांकडे नातेवाइकांनी चौकशी केली असता, डोक्यात मारहाण झाल्याचे सांगितले. बुधवारी उपचार सुरू असताना आयेशाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंके, पोलिस निरीक्षक विलास भोसले, पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांनी भेट दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक भीमगोंड पाटील, रामराव पाटील करीत आहेत.

Web Title: Wife death due to husband's beating due to suspicion of character in Vathar-Vadgaon kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.