Kolhapur: नाश्ता वेळेत न आणल्याच्या रागातून पत्नीचा खून, भावाला सांगून पती फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:57 PM2024-03-27T16:57:41+5:302024-03-27T17:14:29+5:30
मानेवर विळ्याचा वार
गडहिंग्लज : उसाची लावण करत असताना न्याहरी वेळेत न आणल्याच्या रागातून विळ्याने वार करून पतीने पत्नीचा जीव घेतला. सुशीला मारुती बेळाज (रा. खणदाळ, ता. गडहिंग्लज) असे दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती मारुती शिवाप्पा बेळाज याच्याविरुद्ध पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे. या घटनेमुळे नूल-हलकर्णी परिसरासह गडहिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी: मूळचे हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील रहिवासी असलेले मारुती बेळाज हे पत्नी सुशीला, मुलगा बसवराज, सून सुप्रिया यांच्यासह खणदाळ येथील बाळूमामा मंदिराच्या उत्तरेकडील कंकणवाडी-बेळाज वसाहतीत राहतात.
वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्याची शेती कसायला घेतली आहे. सोमवारी (२५) नूल येथील शेतमालक सावंत यांच्या शेतात उसाची लावण सुरू होती. त्यावेळी पत्नी सुशीला हिने सकाळी न्याहरी वेळेत आणली नाही म्हणून मारुतीने तिला शिवीगाळ केली.
सायंकाळी मारुतीचा मुलगा बसवराज व सून सुप्रिया हे दोघेही देवदर्शनासाठी नूल येथील सुरगीश्वर मठाला गेले होते. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास मारुती व सुशीला यांच्यात पुन्हा वादावादी झाली. ‘न्याहरी’चा राग मनात धरून विळ्याने तिच्या मानेवर उजव्या बाजूला वार केला. विळ्याचा वार वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनास्थळी परिविक्षाधिन पोलिस अधिक्षक हर्षवर्धन बी.जे., उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी भेट दिली. बसवराज बेळाज यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
‘सुशीला’ला संपवले आहे
मारूती हा शेती व जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करत होता. दारूच्या व्यसनामुळे वारंवार भांडण काढून तो पत्नी सुशीला हिला शिवीगाळ व मारहाण करीत असे. दारूच्या नशेतच त्याने घराच्या दारातच विळ्याने वार केल्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर शेजारी राहणारा भाऊ चन्नाप्पाच्या घरात जाऊन ‘मी सुशीला’ला संपवले आहे’, असे सांगून तो घराच्या पाठीमागील शेतात निघून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.