पतीची नोकरी गेल्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पत्नीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:28 AM2020-07-07T11:28:15+5:302020-07-07T11:29:26+5:30
लॉकडाऊन कालावधीत पतीची नोकरी गेल्याने हवालदिल होऊन गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पत्नीचा सोमवारी मृत्यू झाला. नीलम ऊर्फ शीतल सागर पोवार (वय २८, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : लॉकडाऊन कालावधीत पतीची नोकरी गेल्याने हवालदिल होऊन गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पत्नीचा सोमवारी मृत्यू झाला. नीलम ऊर्फ शीतल सागर पोवार (वय २८, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे.
सुभाषनगरातमध्ये सागर व नीलम हे दाम्पत्य दोन अपत्यांसह राहत होते. सागर पोवार हे एका खासगी कंपनीत कामास होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन केले. लॉकडाऊन लांबल्याने आर्थिक मंदी निर्माण झाली. त्याचा फटका संबंधित कंपनीला बसल्याने कंपनीतील कामगारांची कपात केली. त्याचा फटका सागर पोवार यालाही बसून त्याची नोकरी गेली.
पतीची नोकरी गेल्याचा धक्का निलम यांनाही बसला, पण तरीही दोघांनी किरकोळ कामे करीत संसाराचा गाडा सुरू ठेवला होता. पण, दोघांच्याही तटपुंज्या कमाईतून घरखर्च भागत नसल्याने ते तणावाखाली होते. बुधवारी (दि.१) सकाळी पती खासगी कामासाठी बाहेर गेले असताना नीलम पोवार यांनी घरातच दोरीने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाइकांनी त्यांना तातडीने बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. अखेर सोमवारी सकाळी त्याची उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली.