बुद्धपौर्णिमेला होणाऱ्या वन्यप्राणी गणनेला पुन्हा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:23 AM2021-05-23T04:23:34+5:302021-05-23T04:23:34+5:30
कोल्हापूर : दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होणाऱ्या वन्यप्राणी गणनेला सलग दुसऱ्यावर्षी स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय वन्यजीव विभाग ...
कोल्हापूर : दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होणाऱ्या वन्यप्राणी गणनेला सलग दुसऱ्यावर्षी स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय वन्यजीव विभाग हा निर्णय घेऊ शकतो, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे संचालक समाधान चव्हाण यांनी दिली. यासंदर्भात लेखी पत्र अद्याप प्राप्त झाले नसले, तरी गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी ही वन्यप्राणी गणना होण्याची शक्यता नाही.
बुद्धपौर्णिमेच्या टिपूर चंद्रप्रकाशात वनविभाग वन्यप्राणी गणना करते. कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या वनविभागाच्या पाच परिक्षेत्रातही दरवर्षी वन्यप्राणी गणना होत असते. यंदाही बुधवार, दि. २६ मे रोजी बुध्दपौर्णिमा आहे. परंतु कोरोनामुळे वन्यजीव विभागाला यंदाही राधानगरी आणि सागरेश्वर अभयारण्य क्षेत्रातील पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद करण्याची संधी सलग दुसऱ्यावर्षी हुकली आहे. या गणनेसाठी यापूर्वी दोन्ही अभयारण्य क्षेत्रात सुमारे ७० पाणवठ्यांवर मचाण बांधण्यात आले होते, अशी माहिती वन्यजीवचे राधानगरी वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली.
पदचिन्हे आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्यप्राणी गणना केली जाते. त्यासाठी कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्याशेजारी मचाण उभारून त्यावरून वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात येते. या कामात अधिकाधिक लोकसहभाग मिळावा, यासाठी वन्यजीवप्रेमींनाही सहभागी करून घेतले जात असे. त्यासाठी सहभागी होणाऱ्या वन्यप्रेमींकडून शुल्कही आकारले जात होते. त्यात टी-शर्ट, पिशवी, पुस्तके, जेवण यांचा समावेश होता. यंदाही पर्यटनबंदी, कोरोनामुळे तसेच संचारबंदीमुळे ही वन्यप्राणी गणना होणार नाही, हे निश्चित.
गणना करण्याचे तंत्र बदलले
बुध्दपौर्णिमेला प्रथेप्रमाणे वन्यप्राणी गणना केली जात असली, तरी गेल्या वीस वर्षांपासून गणना करण्याची तंत्रे बदलली आहेत. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून ही गणना होत असते. त्यामुळे कॅमेरा ट्रॅप, रेडिओ कॉलर या उपकरणांमुळे अशी गणना सुलभ झाली आहे. भविष्यात वन्यजीव संशोधनात किंवा सर्वेक्षण कार्यात ड्रोनचा वापर करण्यासंबंधी महाराष्ट्र शासन विचारात आहे.