वन्यप्राणी तस्करांचा वन कर्मचाऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:25 AM2021-04-17T04:25:14+5:302021-04-17T10:54:47+5:30
Wildlife Kolhapur ForestDepartment : गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव नजीकच्या उंबरवाडी फाट्यावर खवल्या मांजराच्या विक्रीचा व्यवहार सुरू असताना तस्करांनी केलेल्या हल्ल्यात मानद वन्यजीव संरक्षक रोहन भाटे (रा. कऱ्हाड, जि. सातारा) हे जखमी झाले. सापळ्यात वनविभागाने संशयितांकडील खवले मांजर जप्त केले आहे. शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.
गडहिंग्लज : गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव नजीकच्या उंबरवाडी फाट्यावर खवल्या मांजराच्या विक्रीचा व्यवहार सुरू असताना तस्करांनी केलेल्या हल्ल्यात मानद वन्यजीव संरक्षक रोहन भाटे (रा. कऱ्हाड, जि. सातारा) हे जखमी झाले. सापळ्यात वनविभागाने संशयितांकडील खवले मांजर जप्त केले आहे. शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, राधानगरी व गडहिंग्लज परिसरात खवले मांजराची तस्करी होत असल्याची माहिती कऱ्हाडचे मानद वन्यजीव संरक्षक रोहन भाटे यांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यासंदर्भात त्यांनी आजरा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार संयुक्तरीत्या सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
संशयिताने डमी गिऱ्हाईक म्हणून पाठविण्यात आलेल्या भाटे व सांगलीचे वन्यजीव संरक्षक अजितकुमार पाटील यांना गडहिंग्लजहून उंबरवाडी येथील देवळासमोरील उजव्या बाजूच्या निळ्या रंगाच्या दरवाजा असणाऱ्या घरात नेले. त्यानंतर काही वेळाने एका चारचाकी वाहनातील प्लास्टिक ड्रममधून आणलेले खवले मांजर त्यांना दाखवले.
त्यानंतर बोलणी करण्यासाठी ते चंदगड- गडहिंग्लज मार्गावरील उंबरवाडी फाट्यावर आले. त्यावेळी त्यांनी खवले मांजर व संशयितांना आपल्या गाडीत बसवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात आलेल्या संशयितांनी लाकडी ओंडक्यांनी भाटे यांच्यावर जोरदार हल्ला केला आणि त्यांच्याकडील ते खवले मांजर काढून घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, भाटे हे एका दुचाकीवरून गडहिंग्लजकडे निघाले. त्यांच्यापाठोपाठ येणाऱ्या गाडीतील खवले मांजर काढून घेण्यासाठी त्या तस्करांनी गडहिंग्लजपर्यंत त्यांचा पाठलाग केला. चारचाकी व दुचाकी वाहने आडवी घालून त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला. अखेर आरडाओरडा करत त्यांनी गडहिंग्लज नगरपालिकेजवळील पोलीस चौकीत जाऊन आतून दरवाजा लावून आपला बचाव करून घेतला. त्यामुळे ते तस्कर पळून गेले.
आजरा परिक्षेत्र वनअधिकारी अमरजित पवार, वनरक्षक सुनील शिंदे, वनरक्षक रणजित पाटील, वनपाल बी. एल. कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्यातील वाहने व संशयितांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.
राधानगरीतील सापळा अयशस्वी
कोकणातून आणलेले एक खवले मांजर संशयितांनी राधानगरी येथे विक्रीसाठी ठेवल्याची माहिती वनखात्याला मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणीही सापळा लावण्यात आला होता; परंतु त्याचा सुगावा लागताच संशयितांनी त्या गिऱ्हाईकांना गडहिंग्लजला बोलावून घेतल्याची चर्चा घटनास्थळी होती.
संशयित औषध दुकानदार ?
संशयित आरोपींपैकी एकजण राधानगरी येथील औषध दुकानदार आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून काढलेल्या पासच्या आधारेच तो कोरोनाच्या संचारबंदीतही बिनधास्त फिरत होता. त्यानेच त्या डमी गिऱ्हाईकांना उंबरवाडी - महागावला नेल्याची चर्चा होती. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या अन्य चार साथीदार आणि गुन्ह्यातील वाहनांचा पोलीस रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते.