सहकाराचा आदर्श असणाऱ्या आजरेकरांना जिल्हा बँकेत संधी मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:02+5:302021-08-23T04:27:02+5:30

आजरा : आजरा तालुक्यात पतसंस्थांपासून सहकारी बँकांचे जाळे चांगले आहे. जिल्हा, राज्य व देशपातळीवर या सहकारी संस्थांनी आपला वेगळा ...

Will Ajrekar, who is an ideal of co-operation, get a chance in the District Bank? | सहकाराचा आदर्श असणाऱ्या आजरेकरांना जिल्हा बँकेत संधी मिळणार का?

सहकाराचा आदर्श असणाऱ्या आजरेकरांना जिल्हा बँकेत संधी मिळणार का?

Next

आजरा : आजरा तालुक्यात पतसंस्थांपासून सहकारी बँकांचे जाळे चांगले आहे. जिल्हा, राज्य व देशपातळीवर या सहकारी संस्थांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. सहकारी संस्था आदर्शवत, मात्र जिल्हा बँकेत सहकारी पतसंस्था गटातून आजरेकरांना आजपर्यंत संधी मिळालेली नाही. आजऱ्यातील सहकाराचा आदर्श जिल्हा बँकेत घालून देण्यासाठी पतसंस्था गटातून उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका आहे.

आजरा तालुक्यात आजरा बँक, जनता बँक, स्वामी विवेकानंद पतसंस्था, आजरा सूतगिरणी, जनता गृहतारण संस्था, आजरा मर्चंट, गजानन पतसंस्था, तालुका संघ यांसह सर्व शासकीय व निमशासकीय, शिक्षकांच्या पतसंस्था या चांगल्या चाललेल्या आहेत.

प्रत्येक संस्थांनी सहकारातील आपला वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. प्रत्येक संस्थांचा नफा लाखापासून कोटीपर्यंत आहे. आजरेकरांमध्ये सेवाभावी वृत्ती चांगली आहे. त्यामुळे सर्वच सहकारी संस्थांची प्रगती आदर्शवत अशी आहे. जिल्हा, राज्य व देशावरील संकटावेळी सर्वच सहकारी संस्था सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीसाठी धावून येतात.

जिल्हा बँकेत ३० वर्षांपूर्वी माधवराव देशपांडे यांना इतर सहकारी संस्था गटातून संधी मिळाली होती. त्यानंतर आजऱ्याला अद्यापही संधी मिळाली नाही. जिल्हा बँकेवर सेवा संस्था गटातून बाबासोा पवार, राजारामबापू देसाई, काशिनाथअण्णा चराटी यांना संधी मिळाली, तर आता अशोकअण्णा चराटी जिल्हा बँकेचे संचालक आहेत.

तालुक्यातील सहकारी संस्थांचे जाळे पाहता, पतसंस्था गटातून आजऱ्याला संधी मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी राजकीय धुळवड उठवली आहे. कोणाला उमेदवारी यापेक्षा पतसंस्था गटातून जिल्हा बँकेत आजरेकरांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चौकट :

आजरेकरांना जिल्हा बँकेत न्याय मिळणार का?

'गोकुळ'मध्ये सर्वसाधारण गटातील आजऱ्याचा उमेदवार नाही. आजरा नगरपंचायत झाल्यामुळे जिल्हा परिषदेचेही दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे जिल्हा पातळीवर आजरेकरांना काम करण्यासाठी जिल्हा बँक हा एकमेव पर्याय आहे? आमदार प्रकाश आबीटकर यांनी 'गोकुळ'मध्ये राधानगरी व भुदरगड तालुक्यांना, तर जि. प. बांधकाम सभापती पदही भुदरगड तालुक्याला दिले आहे. राजकीय समतोल साधण्यासाठी आजऱ्याला पतसंस्था गटातून उमेदवारी देऊन न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया

...

सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात पतसंस्था, गृहतारण संस्था व बँका चांगल्या पद्धतीने चालविल्या आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेत पतसंस्था गटातून उमेदवारीची प्राधान्याने संधी मिळाली पाहिजे. संधी दिल्यास आजरेकर जिल्हा बँकेत सहकारातील कामाचा वेगळा ठसा उमटवतील.

- जनार्दन टोपले (अध्यक्ष, स्वामी विवेकानंद पतसंस्था आजरा.)

Web Title: Will Ajrekar, who is an ideal of co-operation, get a chance in the District Bank?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.