अंबाई जलतरण तलावाचे रूप बदलणार का? (पूर्वार्ध )
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:50+5:302020-12-09T04:18:50+5:30
एक कोटी वीस लाखांचा ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव दिवास्वप्न अमर पाटील / लोकमत न्यूज नेटवर्क कळंबा : सन १९७७ ...
एक कोटी वीस लाखांचा ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव दिवास्वप्न
अमर पाटील / लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबा : सन १९७७ साली उभारण्यात आलेल्या अंबाई जलतरण तलावाचे जुने रूप बदलून येथे एक कोटी वीस लाखांचा अत्याधुनिक सुविधांनी युक्त असा ऑलिम्पिक दर्जाचा, प्रशस्त व सुसज्ज जलतरण तलाव उभारण्यात येणार आहे. मात्र जलतरण तलावाच्या पुनर्विकास योजनेचे २०१७ मध्ये सुरू असणारे काम गेली दोन वर्षे प्रशासकीय पातळीवर रखडले असल्याने, एक कोटी वीस लाखांचा ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव आता प्रत्यक्षात साकारणार की दिवास्वप्नच राहणार, हा प्रश्न क्रीडाप्रेमींतून उपस्थित केला जात आहे.
क्रीडासंस्कृतीची गौरवशाली परंपरा असणाऱ्या कोल्हापुरात, विशेषतः दक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट उपनगरे व लगतच्या ग्रामीण भागांत जलतरण खेळाचा विकास व्हावा यासाठी १९७७ साली अंबाई जलतरण तलाव उभारण्यात आला. आजमितीला हा जलतरण तलाव समस्यांच्या गर्तेतून जात आहे. माफक तिकीट दराने येथे वर्षभर पोहणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी खेळाडूंच्या प्राथमिक सोयीसुविधाची येथे वानवा असल्याने सरावासाठी खेळाडू पाठ फिरवतात.
क्रीडासुविधा निर्माण करण्यासाठी राज्याच्या २०१२ च्या क्रीडा धोरणान्वये क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक साहाय्य योजनेअंतर्गत पालिका क्षेत्रांतील प्रभाग ७१, रंकाळा तलाव येथील अंबाई जलतरण तलावाच्या पुनर्विकासाचे काम २०१७ साली सुरू करण्यात आले. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा युवक सेवा संचालनालयाने महानगरपालिकेला २१ सप्टेंबर २०१७ ला प्रस्ताव सादर करण्यास कळविले. १० नोव्हेंबर २०१७ च्या महासभेत ठराव क्रमांक २०६ अन्वये मान्यता घेत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला.
जिल्हा क्रीडाधिकारी यांनी यातील त्रुटी दाखवत पुन्हा सुधारित प्रस्ताव सादर करण्याबद्दल पालिकेस सूचित केले. त्यानुसार फेरप्रस्ताव सादर करण्यात आला. या कार्यालयाच्या शिफारशीनंतर हा प्रस्ताव उपसंचालक व क्रीडा संचालनालयाची मान्यता मिळविण्यासाठी रखडला आहे. वास्तविक या विभागाची मान्यता मिळताच तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यास निधी उपलब्ध होऊन काम मार्गी लागणार हे निश्चित. गतवेळी आमदार अमल महाडिक यांनी या प्रश्नी बराच पाठपुरावा केला होता. आता राज्यात सत्ताबदल झाला असून, पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया
जलतरण क्रीडाविश्वास नवी उभारी मिळून जगभरात कोल्हापूरच्या खेळाडूंनी नाव करावे यासाठी ऑलिम्पिक दर्जाचा तलाव पूर्णत्वास जावा म्हणून प्रशासनाने पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- माजी नगरसेवक शारंगधर देशमुख
( पूर्वार्ध) अंबाई जलतरण तलाव बंद असल्याने फोटो उपलब्ध होत नाही नेट वरून फोटो उपलब्ध करावा ही विनंती