लोककलावंतांना कोणी आधार देईल का ?, जिल्ह्यातील कलाकारांची आर्त हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 12:50 PM2021-06-06T12:50:26+5:302021-06-06T13:03:47+5:30
corona virus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणाची शान असलेल्या दशावतार, भजन आणि संगीत कला जोपासणाऱ्या लोककलावंताना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. वर्षाहून अधिक काळ त्यांना रोजगारच उपलब्ध नसल्याने खूप बिकट परिस्थिती सर्व लोककलावंतांवर येऊन ठेपली आहे.
सुधीर राणे
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोकणाची शान असलेल्या दशावतार, भजन आणि संगीत कला जोपासणाऱ्या लोककलावंताना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्गच्या या लाल मातीतील कलाकार आणि त्यांची कला देशोधडीला लागली आहे. वर्षाहून अधिक काळ त्यांना रोजगारच उपलब्ध नसल्याने खूप बिकट परिस्थिती सर्व लोककलावंतांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे त्यांना आता समर्थ आधाराची गरज असून राजाश्रय नसला तरी निदान लोकाश्रय तरी या महामारीच्या काळात मिळावा, अशी इच्छा अनेक लोककलावंतांकडून व्यक्त केली जात आहे.
मार्च २०२० मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. हळूहळू कोरोनाचा प्रभाव जिल्ह्यात वाढू लागला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने इतर पर्यायांबरोबरच अनेकवेळा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. अनेक निर्बंध घातले. त्यामुळे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांवर आपोआपच बंदी आली.
ग्रामदेवतांच्या यात्रा, महोत्सव, सत्यनारायण पूजा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा अनेक उत्सवांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सभा मंडपात एका बाकावर भरणारा दशावतारातील राजाचा नयनरम्य दरबार आज हरवला आहे. भजन डबलबारी सामन्याला होणारी रसिकांची प्रचंड गर्दी, मंदिरात तसेच सार्वजनिक उत्सवात होणारे विविध कलात्मक, सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळेच या कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ न शकल्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ही चिंता प्रत्येक कलावंताला सतावते आहे.
कलेची जोपासना करण्यासाठी बँकांचे कर्ज घेतलेले अनेक कलावंत आणखीन कर्जाच्या डोंगराच्या ओझ्याखाली दबत चालले आहेत. आपल्या कलेतून लोकांचे मनोरंजन करता करता त्यांना आनंद देणाऱ्या अनेक कलावंतांच्या डोळ्यात आर्थिक संकटामुळे अश्रू येत आहेत. कोरोनाचा हा कालावधी असाच वाढत राहिला तर कसे जगायचे ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
आमच्यासारख्या कलावंतांसाठी आज कोणीही वाली नाही अशी भावना अनेक कलाकार बोलून दाखवत आहेत. याची दखल शासनाबरोबरच लोकप्रतिनिधीं घ्यावी आणि सिंधुदुर्गचा पर्यायाने कोकणच्या कलेचा वारसा जपणाऱ्या या लोककलावंताना मदतीचा हात द्यावा .अशी मागणी या लोककलावंतांकडून करण्यात येत आहे.
कलाकार मोठ्या आर्थिक संकटात
या कोरोनाच्या महामारीत कलाकार पार भरडून गेला आहे. बरेच कलाकार हे आपल्या कलेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. फक्त सिंधुदुर्गच नव्हे तर गोवा रत्नागिरी, मुंबई अशा विविध ठिकाणी जाऊन आपल्या कलेचे ज्ञानदान करीत होते. कला सादर करीत होते. त्यातून चांगले कलाकार त्यांनी घडविले. मात्र, आता संगीत क्षेत्रातील कलाकार, भजनी बुवा,गायक ,वादक तसेच दशावतार लोककलेतील सर्वच कलाकार मोठ्या संकटात सापडले आहेत . याचा विचार शासनाने, लोकप्रतिनिधीनी, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दानशूर लोकांनी करावा आणि लोककलावंतांना या संकटातून वाचवावे.
- महेश सावंत,
पखवाज अलंकार , कुडाळ.
कलाकारांना सतावतेय आर्थिक विवंचना
उदरनिर्वाहासाठी थोड्याशा शेतीबरोबरच कलेच्या माध्यमातून मिळणारा रोजगार हाच अनेक कलावंतांचा आधार आहे. कला रसिकांकडून मिळणारी दाद ही सुद्धा कलाकारांसाठी महत्वपूर्ण असते. मात्र, आता रोजचा घरखर्च, विजेचे बिल, काही जणांचे घराचे कर्जाचे हफ्ते शिवाय इतर खर्च कसे भागवायचे हा मोठा प्रश्न कलावंतांसमोर आहे. त्यांना आर्थिक विवंचना दररोज सतावतेय. त्यातून कसे बाहेर पडायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.