सहभाग स्पष्ट होताच अटक करणार : प्रधान
By admin | Published: February 1, 2015 01:15 AM2015-02-01T01:15:26+5:302015-02-01T01:31:08+5:30
महापौरांची भूमिका संदिग्ध : डिस्चार्ज मिळताच चौकशी करणार; नागरिकांना तक्रारीचे आवाहन
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांची लाच प्रकरणातील भूमिका समजून घेतली आहे. त्यांची भूमिका संदिग्ध असून, रुग्णालयातून घरी जाताच त्यांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल. यावेळी त्यांचा गुन्'ामध्ये सहभाग स्पष्ट झाला तर त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पुणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात पहिल्यांदाच महापौरांवर कारवाई झाल्याने पोलीस अधीक्षक प्रधान यांनी कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांच्याकडून त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले, लाचप्रकरणी आज, शनिवारी सकाळी महापौर माळवी यांना अटक करण्यासाठी पथक गेले होते; परंतु त्या रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजले. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई तात्पुरती थांबविली आहे. प्राथमिक दृष्ट्या त्यांची भूमिका समजून घेतली आहे. ती संदिग्ध असून त्यांना उपचारानंतर घरी पाठविताच चौकशीसाठी ताब्यात घेतले जाईल. त्यामध्ये त्यांचा गुन्'ामध्ये सहभाग स्पष्ट झाला असेल तर त्यांना अटक केली जाईल.
नागरिकांना आवाहन
पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी नागरिकांना असे आवाहन केले आहे की, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमच्याकडे कोणी लाचेच्या स्वरूपात पैसे मागत असेल तर तुम्ही १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा. तुम्ही जिथे असाल तिथे आमचे अधिकारी व कर्मचारी येऊन तक्रारीची दखल घेतील. तक्रारदाराचे पैसे एक महिन्याच्या आत धनादेशाद्वारे परत केले जातील. कायदेशीर काम अडलेले असेल तर ते पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी आमची राहील.
राज्यात कारवाईचे शतक
चालू वर्षात राज्यात ९९ कारवाया झाल्या. त्यामध्ये सांगोला (सोलापूर) येथील दोघा नगराध्यक्षांना लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली होती. पहिल्या नगराध्यक्षाने ७५ हजार रुपयांची लाच घेतली होती, तर त्याच्या जागी आलेल्या दुसऱ्या नगराध्यक्षाने १० हजारांची लाच घेतली होती. दोन महिन्यांच्या फरकाने ही कारवाई करण्यात आली. कोल्हापूर विभागाने चालू वर्षातील पहिला महिना संपत आला तरी खाते उघडले नव्हते, याबाबत काल सकाळीच पोलीस उपअधीक्षक आफळे यांच्याशी आपण चर्चा केली होती. त्यानंतर काही तासांतच त्यांनी महापौरांवर कारवाई करून शंभरचा आकडा पूर्ण केला.
अशा अडकल्या महापौर...
तक्रारदार संतोष पाटील यांनी सकाळी आठच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक आफळे यांची भेट घेतली. त्यानंतर सर्व प्लॅन करून त्यांच्यासोबत दोन पंच देण्यात आले. तिघांच्याही शर्टला कॅमेरे व व्हॉईस रेकॉर्डर्स बसविण्यात आले. त्यानंतर महापौरांचा स्वीय सहायक गडकरी याला फोन केला. त्याने पाटील यांना महापालिका आवारात बोलावून घेतले. याठिकाणी पाटील व दोन पंच गेले. गडकरीशी ठरलेल्या प्लॅनप्रमाणे बोलणी करून महापौरांना भेटायचे आहे असे सांगितले. त्यानुसार तो तिघांना घेऊन महापौरांच्या दालनात गेला. याठिकाणी पाटील याने ‘मॅडम, चाळीस हजार फार मोठी रक्कम आहे. ती मला देणे शक्य नाही. त्यामुळे सोळा हजार रुपये गडकरी यांच्याकडे दिले आहेत.’ त्यावर महापौर यांनी ‘ठीक आहे, तुमचं काम केले जाईल,’ असे सांगितले. ही संपूर्ण चर्चा रेकॉर्ड करण्यात आली आहे. त्यानंतर बाहेर पाळत ठेवून असलेल्या पथकाने गडकरीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील सोळा हजार रुपये हस्तगत केले. तेथून महापौरांना त्यांच्या दालनातून ताब्यात घेतले. या सर्व प्रकरणामध्ये महापौरांची पैसे घेण्यासाठी संमती असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे प्रधान यांनी सांगितले.