‘त्या’ गुंडाची होणार चौकशी
By admin | Published: June 19, 2016 01:15 AM2016-06-19T01:15:22+5:302016-06-19T01:15:22+5:30
कैदी अपहर प्रयत्न प्रकरण : उद्यापर्यंत कोठडी
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामधील (सीपीआर) कैदी वॉर्डमधील जेवणाच्या पार्टी प्रकरणी शहरातील एका गुंडाचे नाव पोलिस तपासात पुढे येत आहे. या गुंडानेच या पार्टीचे नियोजन केले असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना केल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या चार व उर्वरित दोन अशा एकूण सहाजणांना शनिवारी न्यायालयाने उद्या, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली.
दोन दिवसांपूर्वी ‘सीपीआर’च्या कैदी वॉर्डमध्ये पुण्याच्या गजा मारणे टोळीचा गुंड सोमप्रशांत पाटील याच्याबरोबर सहायक फौजदार बाबूराव चौगुले, पोलिस कॉन्स्टेबल मारुती पाटील, जगदीश बाबर, संजय दिनेश कदम, अभिजित शरद चव्हाण, दिग्विजय शिवाजी पोवार या सातजणांनी जेवणाची पार्टी केली. त्यावेळी छापा टाकून या सातजणांना अटक केली. यामध्ये अभिजित चव्हाण, जगदीश बाबर व संजय कदम हे तिघेजण उडी टाकून पळून जाताना जखमी झाले. यापूर्वी अटक केलेल्या बाबूराव चौगुले, मारुती पाटील, दिग्विजय पोवार, सोमप्रशांत पाटील यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज, शनिवारी संपली. त्यामुळे या चौघांसह बाबर, अभिजित चव्हाण या दोघांसह सहाजणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. शहरातील एका गुंडाने या पार्टीचे नियोजन केले असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.