आजऱ्यातील लाभार्थी कधी पात्र ठरणार ?
By admin | Published: August 14, 2015 11:10 PM2015-08-14T23:10:54+5:302015-08-14T23:10:54+5:30
श्रावणबाळ योजना : कागलमध्ये प्रक्रिया सुरू; आजराकरांना प्रतीक्षा
कृष्णा सावंत- पेरणोली श्रावणबाळ योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया कागल तहसीलदारांनी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे आजरा तालुक्यातील अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना पात्र करण्याची प्रक्रिया कधी राबविणार, अशी विचारणा तालुक्यातील लाभार्थ्यांमधून होत आहे.कागल तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे तीन हजार अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा पेन्शन योजना सुरू होणार आहे. मुश्रीफ यांनी शासनाच्या परिपत्रकाच्या आधारावर समितीने मंजूर केलेली पेन्शन योजना नामंजूर करता येत नसल्याचे संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे खरोखर पात्र असूनही अपात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा आशा निर्माण झाली आहे.
आजरा तालुका हा दुर्गम तालुका आहे. वाड्या-वस्त्यावर शेतात शेतमजुरी करणारी जनता अधिक आहे. येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले मजुरी, हॉटेल कामगार, बांधकाम कामगार, आदी कामे करतात. त्यामुळे आजऱ्याच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच एकाचवेळी एक हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना पेन्शन योजना मंजूर झाली.
मात्र, मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून फेर चौकशीमधून अपात्र करण्याचा धडाका लावला. त्यात काही खरोखर पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या तसेच दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांचा समावेश झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. याबाबत आजरा
येथील सामाजिक संवेदना संस्थेमध्ये निवेदन दिले आहे. केवळ ३५० लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. यामधील काही लाभार्थी वगळता बहुतांश लाभार्थी पात्र
आहेत. आजऱ्यातील तहसीलदारांची प्रतिमा सामाजिक बांधीलकी
जपणारी अशी असल्याने आजरा तालुक्यातही कागलप्रमाणे प्रक्रिया राबवून बंद झालेली पेन्शन
पुन्हा सुरू होण्याची लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे.
कागल तालुक्याप्रमाणे आम्हीसुद्धा बंद झालेल्या पेन्शनधारकांची पेन्शन सुरू करणार आहोत. त्या लाभार्थ्यांची जनसुनावणी घेऊन पात्र की अपात्र ठरविण्यात येणार आहे.
- श्रीमती शिल्पा ठोकडे,
तहसीलदार, आजरा.