पक्षविरोधी काम करणाऱ्या खासदारांना उमेदवारी देणार का : मुंबईत कोल्हापूर मतदारसंघाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:20 PM2018-10-06T23:20:20+5:302018-10-06T23:22:49+5:30
गेल्या साडेचार वर्षांत पक्षविरोधी काम करणाºया खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा उमेदवारी देणार का? असा सवाल जिल्ह्यातील राष्टवादीच्या पदाधिकाºयांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना केला.
कोल्हापूर : गेल्या साडेचार वर्षांत पक्षविरोधी काम करणाºया खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा उमेदवारी देणार का? असा सवाल जिल्ह्यातील राष्टवादीच्या पदाधिकाºयांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना केला. पक्षाला गरज होती, त्यावेळी आम्ही संघर्ष करून ‘हातकणंगले’तून लढलो. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी चालणार नाहीत, असे सांगत निवेदिता माने व धैर्यशील माने यांनी या मतदारसंघावर दावा केला.
राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा पक्षाध्यक्ष पवार यांनी शनिवारी मुंबईत घेतला. यामध्ये हातकणंगले मतदारसंघाची चर्चा झाल्यानंतर कोल्हापूरमधून कोण इच्छुक आहात? अशी विचारणा पक्षाध्यक्ष पवार यांनी केली. यावर, खासदारांनी पक्षाचे काम केलेले नाही, कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असून याबाबत श्रेष्ठींकडे आपण वेळ मागत असल्याचे सांगत शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी तोंड फोडले. माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी वीस मिनिटांत गेल्या साडेचार वर्षांतील खासदारांची पक्षविरोधी भूमिका आणि कार्यकर्त्यांची झालेली घालमेल याचा पाढाच वाचला. गेल्या वेळेला नरेंद्र मोदी यांच्या लाटेत दोन्ही कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडे व रक्ताचे पाणी करून निवडून आणले, पण महाडिक यांनी निवडून आल्यापासून पक्षविरोधी काम सुरू केले.
हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्यावर पक्ष वाढविण्याची जबाबदारी आहे का? असा सवाल करत ज्यांच्या जिवावर धनंजय महाडिक यांना उमेदवारी देणार आहात, त्या कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता आहे. महापालिका, नगरपालिका, जिप निवडणुकीत राष्टÑवादीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला, एवढ्यावर ते थांबले नाहीत. ‘भाजप-ताराराणी’च्या नगरसेवकांना निधी देऊन राष्टÑवादीच्या नगरसेवकांचे खच्चीकरण केले.
पक्षविरोधी काम करणाºयांना पुन्हा उमेदवारी द्यायची का? याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावा, असे लाटकर यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर उपस्थित होते.
‘कोल्हापुरातून’ शरद पवार यांनी उभे राहावे
राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाया कोल्हापूर आहे. याच विचाराने आयुष्यभर ज्यांनी समाजकारण व राजकारण केले, त्या पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पुण्याऐवजी कोल्हापुरातून उभे राहावे, अशी राजेश लाटकर यांनी विनंती केली. यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली, पण पवार यांनी केवळ स्मितहास्य केले.
उमेदवारी सहा महिने अगोदरच जाहीर होणार
लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेचे मतदारसंघ येत असल्याने ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली तर उमेदवार पोहोचू शकत नाही. म्हणून सहा महिने अगोदरच उमेदवार जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
धनंजय महाडिक यांचे मौन
पदाधिकाºयांची आक्रमक भूमिका मांडल्यानंतर पक्षाध्यक्ष पवार यांनी याबाबत तुम्हाला काय बोलायचे आहे का? अशी विचारणा महाडिक यांना केली, पण उमेदवारीबाबत पक्षाध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे सांगून मौन धारण केले.