चंदगडला या हंगामात तरी शेतकऱ्यांच्या काजूला दर मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:27+5:302021-03-31T04:25:27+5:30

नंदकुमार ढेरे । चंदगड : धुके, ढगाळ वातावरण, पाऊस अशा बदलत्या वातावरणाचा सामना करीत काजू पीक सजले आहे. त्यामुळे ...

Will Chandgad get cashew price for farmers this season? | चंदगडला या हंगामात तरी शेतकऱ्यांच्या काजूला दर मिळणार का?

चंदगडला या हंगामात तरी शेतकऱ्यांच्या काजूला दर मिळणार का?

Next

नंदकुमार ढेरे ।

चंदगड : धुके, ढगाळ वातावरण, पाऊस अशा बदलत्या वातावरणाचा सामना करीत काजू पीक सजले आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यात यावर्षी काजू पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीत झालेले प्रचंड नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.

यावर्षी दरही चांगला मिळण्याची अपेक्षा असली तरी उत्पादन सुरू झाल्यानंतर दर एकदम कोसळतो हा अनुभव नवा नाही. त्यामुळे योग्य दरासाठी काजू उत्पादक काय भूमिका घेतात व तालुक्यातील शेतकरी संघटनांचे दरासाठी योगदान कसे राहते, यावरच यंदाचा काजू हंगाम शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार का, हे अवलंबून असेल.

चंदगड तालुक्यात काजू फळधारणेस प्रारंभ झाला आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे काजूची कवडीमोल भावाने विक्री झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यावर्षी काजू पीक उत्तम स्थितीत मोहरले असून, उत्पादनही चांगले मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

इतर पिकांप्रमाणे मोठी गुंतवणूक होत नसल्याने काजू पीक चंदगडकरांसाठी किफायतशीर आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून मेपर्यंत काजू बागेत निगराणी करावी लागते. यासाठी मनुष्यबळ खर्ची पडत असल्याने यासाठी घेतले जाणारे कष्ट हे अधिकच आहेत.

हंगामात काजू बाग दोन ते तीन वेळा बेंदावी लागेत. बागेत खोप तयार करून दिवसभर काजूची राखण करावी लागते. काजू वेचणीसाठी घरातील सर्वच मंडळी कामाला लागतात. त्यामुळे या पिकासाठी घेतला जाणारा वेळ आणि मनुष्यबळ पाहता योग्य भाव मिळणे अपेक्षित असते. तीन-चार वर्षांपूर्वी काजूला प्रतिकिलो १६० रुपये भाव मिळाला होता. चंदगडचे काजू चवदार असूनही त्यास हमीभाव नसल्याने काजू उत्पादकांचा अपेक्षाभंग होत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा फटका काजू उत्पादकांनाही बसला. उत्पादकांकडून व्यापाऱ्याने केवळ ६० ते ८० रुपये प्रतिकिलो या दराने काजू खरेदी केली.

काही शेतकऱ्यांनी दोन-तीन महिने काजूसाठा घरीच ठेवला. आज ना उद्या दर वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र भाव न वाढल्याने अखेर मिळेल त्या दराला काजू विक्री करावी लागली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण काजू उत्पादनावर फिरते. लग्नसराईच्या हंगामातच काजूची सुगी होत असल्याने शेतकरी कुटुंबातील अनेक गरजांची पूर्तता या काजूवर ठरवली जाते.

काजू राखण, पक्व झालेले पीक जमा करणे, बागेची स्वच्छता, नवीन रोपांची जोपासना, काजू झाडावर फवारणी करणे अशी कामे करीत चार-पाच महिने वेळ देणाऱ्या शेतकऱ्यांच्या काजूला योग्य भाव मिळाला की कष्टाचे चीज झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.

--------------------------

* काजू फोटो : ३००३२०२१-गड-०५/०६

Web Title: Will Chandgad get cashew price for farmers this season?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.