चंदगड नगरपंचायतीचे स्वप्न सत्यात उतरणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:45 AM2018-07-03T00:45:52+5:302018-07-03T00:46:56+5:30
चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून नागरी जीवन जगण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चंदगड शहरवासीयांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी शासनाची सुरू असलेली चालढकल यामुळे
नंदकुमार ढेरे ।
चंदगड : चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून नागरी जीवन जगण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चंदगड शहरवासीयांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी शासनाची सुरू असलेली चालढकल यामुळे नागरिकांत तीव्र संताप आहे. याचा परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेला चंदगड तालुका. तालुक्याची वाढती लोकसंख्या नागरी वस्तीकडे वाटचाल करीत आहे. निसर्गाच्या वरदानामुळे तालुक्याला मोठा नावलौकिक मिळाला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चंदगडची छोट्या शहराकडे वाटचाल सुरू आहे.केवळ ब्रिटिश काळापासून ‘महाल’चा दर्जा मिळाल्यामुळे या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये आहेत. दूरवर ख्याती असलेल्या प्राचीन देव श्री रवळनाथ मंदिर, मंदिराच्या भोवतालच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू, तलाव, धुण्याचे कुंड, लहान मोठी-मंदिरे, सध्या जीर्णोद्धार केलेले रवळनाथ मंदिर, बाबा गार्डन, नामवंत काजू प्रक्रिया कारखाने, शाळा, महाविद्यालय, विविध प्रकारचे व्यवसाय, आदी कारणांमुळे चंदगडचा विस्तार पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तरकडे विस्तारलेला आहे.
तालुक्याला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे शासनाचे काम आहे. मागील शासनाने तालुक्याच्या ठिकाण असलेल्या सर्व ग्रा. पं.ना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जारी केला होता. त्यानुसार चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा मिळालाच पाहिजे. नगरपंचायतीसाठी लागणारे सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करूनही केवळ राजकीयदृष्ट्या चंदगडला नगरपंचातीचा दर्जा देताना वंचित ठेवले आहे.
चंदगडनजीकच्या आजरा शहराला मात्र नगरपंचायतीचा दर्जा देताना शासनाला कोणतीच अडचण आली नाही. मात्र, चंदगडसाठी हात अकडता घेण्यात आला. त्यामुळे भेदाची वागणूक स्पष्ट झाली. पालकमंत्री चंद्रकांतपाटील यांनी चंदगडला मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी हजेरी लावून केलेले भाष्य पोकळ ठरले.
1 चंदगडवासीयांनी नगरपंचायतीच्या मागणीसाठी उभारलेला लढा अगदी सनदशीर आहे. चंदगडवासीय नागरिक आग्रही आहेत; पण संयमी आहेत. ते आपला हक्क लोकशाही मार्गाने मिळवतील. नगरपंचायतीच्या मागणीच्या लढ्यासाठी श्रद्धास्थान असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात पहिली बैठक घेण्यात आली.
2 याठिकाणापासून लढ्याची दिशा ठरवित सनदशीर लढा सुरू करण्यात आला. अखेरच्या टप्प्यात पावसाळ्यापूर्वी नवीन प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. राजकीय स्थानिक नेत्यांनीही पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. मात्र, राजकीय वजन कमी पडल्याने चंदगडच्या नगरपंचायतीचा निर्णय लोबंकळत राहिला आहे.
3 नागरिकांच्या सनदेतील एका भागानुसार जे गाव नागरी वसाहतीकडे वाटचाल करीत आहे. ज्या गावची लोकसंख्या १५००० ते २५००० दरम्यान आहे. भौगोलिक क्षेत्राची वाढ होऊन वस्ती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे, अशा ठिकाणी नगरपंचायत स्थापन करता येते, हे खुद्द नागरिकशास्त्र सांगते. मात्र, चंदगडला शासन ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यापासून का वंचित ठेवत आहे? हे मात्र न सुटणारे कोडे आहे.