ग्रामविकासात हातकणंगले मॉडेल बनवणार--माझा अजेंडा...! आमदार डॉ. सुजित मिणचेकर

By admin | Published: November 23, 2014 09:57 PM2014-11-23T21:57:17+5:302014-11-23T23:45:35+5:30

सुजित मिणचेकर : अ‍ॅग्रीकल्चर हब उभारण्याचा मानस, टेकस्टाईल्स इंडिस्ट्रीजलाही प्रात्साहन देणार

Will create a handcuff model in rural development - my agenda ...! MLA Dr. Sujeet Minachekar | ग्रामविकासात हातकणंगले मॉडेल बनवणार--माझा अजेंडा...! आमदार डॉ. सुजित मिणचेकर

ग्रामविकासात हातकणंगले मॉडेल बनवणार--माझा अजेंडा...! आमदार डॉ. सुजित मिणचेकर

Next

आयुब मुल्ला - खोची- विधायक बदलातून विकासाची कामे करून सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी नियोजनात्मक प्रयत्न केले जातील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मतदारसंघातून दोन नद्या जातात. बहुतांश शेतजमीन सुपीक आहे. इथल्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत परिसरात अ‍ॅग्रीकल्चर हब उभारण्याचा मानस आहे. शेतीबरोबरच औद्योगिक, शैक्षणिक, ग्रामविकास, आदी घटकांची विकासाची चळवळ गतीमान व्हावी यासाठी प्राधान्य देणार असल्याची माहिती हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
हा मतदारसंघ अडीच ब्लॉकचा आहे. भौगोलिक वातावरण शेतीसाठी पूरक आहे. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना श्रम व वेळ अधिक वाया घालवावा लागतो. तुलनेने उत्पादनही खर्चाइतके निघत नाही. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला मिळणे गरजेचे आहे. याकरिता ज्येष्ठ शेतकऱ्यांबरोबरच जे तरुण शेतकरी आहेत त्यांना एकत्रित करून शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेणार आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, प्रशिक्षण शिबिरे, सेमिनार, याद्वारे शेती प्रगतीची माहिती दिली जाईल. प्रायोगिक तत्त्वावर याची सुरूवात करून व्यापकता वाढविली जाईल. मुबलक पाणी, जाणकार शेतकरी, प्रबळ इच्छाशक्ती असणारा तरुणवर्ग मतदारसंघात आहे. या सर्वांच्या सहभागाने शेती व शेतकरी यांना वैभव प्राप्त करून देण्यासाठी अ‍ॅग्रीकल्चरल हब ही संकल्पना साकारली जाईल.
राष्ट्रीय महामार्गालगतचा हा मतदारसंघ दळणवळणाच्या दृष्टीने प्रगतिपथावर नेण्यासाठी विविध औद्योगिक प्रकल्प इथल्या वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. मेकॅनिकल इंडस्ट्रीजबरोबर टेक्स्टाईल इंडस्ट्रीजमध्येही वाढ करण्याचा प्रयत्न राहील. यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. महिलांनाही रोजगार देण्यास प्राधान्य दिले जाईल. महिंला बचत गटांची संख्या वाढवून त्यांना महिला व बालविकास खात्याकडून मदत मिळवून देऊन छोटे-मोठे उद्योग उभा करून दिले जातील.
मतदारसंघात मोठमोठी शैक्षणिक संकुले आहेत. तिथे उच्च शिक्षणाची सोय निर्माण झाली आहे. महानगरातील शैक्षणिक सुविधांप्रमाणे त्या येथेही निर्माण व्हाव्यात यासाठी शासनाकडून या संस्थांना मदत मिळवून देण्यासाठी सहकार्याची भूमिका राहणार आहे. पेठवडगाव, हातकणंगले परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाईल. ते मोफत असेल. याचा निश्चितपणे फायदा प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना होईल, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. तो उत्कृष्ट मजबूत, लवकर व्हावा याचे प्रयत्न राहतील. तालुक्याच्या ठिकाणी भव्य प्रशासकीय इमारत उभारून लोकांची चांगली सोय होईल, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रशस्त जागेची निवड करून भव्य क्रीडासंकुलाचे कामही पूर्णत्वाकडे नेले जाईल. माणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधी मंजूर झाला आहे. ते त्वरित व्हावे यासाठी अग्रक्रमाने प्रयत्न केले जातील.
ग्रामविकासात तर मतदारसंघ आदर्शवत बनविण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न करणार आहे. प्राथमिक टप्प्यात काही छोटी गावे दत्तक घेतली जातील. सर्वार्थाने ती विकसित केली जातील. याचाच आदर्श इतर गावांसमोर ठेवून सर्वच गावे आदर्श विकासाची मॉडेल बनवू. रस्ते, पाणी, वैद्यकीय सेवा यापासून कोणतेही गाव वंचित राहणार नाही, याची सतत काळजी घेतली जाईल.
(उद्याच्या अंकात आमदार सत्यजित पाटील )

‘इट्स माय ड्रीम’
शेतीविषयक प्रबोधनातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समृध्दता आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबवून अ‍ॅग्रीकल्चर हबला प्राधान्य देणार.
वारणा, पंचगंगा या दोन्ही नद्यांच्या सान्निध्यात मतदारसंघ आहे. येथील जमीन सपाट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एकत्रित करून शेती विकासाला चालणार देणार.
मोठ्या शिक्षण संकुलांना शासनाची मदत मिळवून देत तिथे अत्याधुनिक सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करणार.
प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना हातकणंगले व पेठवडगाव परिसरात मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन केले जाईल.
आदर्श ग्राम हा प्रयोग अमलात आणणार आहे. यासाठी सुरूवातीला छोटी गावे विकासासाठी दत्तक घेणार.
जात-पात, धर्म, गट-तट, पक्ष असा कोणताही भेद विकासकामे करताना केला जाणार नाही.

Web Title: Will create a handcuff model in rural development - my agenda ...! MLA Dr. Sujeet Minachekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.