‘दौलत’ आतातरी सुरू होणार का ?

By admin | Published: October 28, 2014 10:26 PM2014-10-28T22:26:47+5:302014-10-29T00:16:04+5:30

कामगार पगाराच्या प्रतीक्षेत : शेतकरी, कामगारांची त्यागाची भूमिका

Will 'Daulat' work start? | ‘दौलत’ आतातरी सुरू होणार का ?

‘दौलत’ आतातरी सुरू होणार का ?

Next

नंदकुमार ढेरे -चंदगड गेली चार वर्षे बंद अवस्थेत असलेला दौलत शेतकरी सहकारी कारखाना या हंगामात तरी सुरू होणार का? याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा देण्यास तयार नाही. गेली चार वर्षे या तारखेला, त्या तारखेला पगार देतो, अशी कामगारांची फसवणूक झाल्याने त्यांचाही या तारखांवरील विश्वास उडाला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरसिंगराव पाटील व ‘दौलत’चे ज्येष्ठ संचालक यांच्यात झालेली दिलजमाई यामुळे दौलत सुरू होण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत नरसिंगराव पाटील यांचा झालेला पराभव व ठरलेल्या तारखेला कामगारांचा न झालेला पगार यामुळे दौलत सुरू होण्याच्या आशा पुन्हा धुसर झाल्या आहेत.
दौलत कारखाना बंद झाल्यामुळे शेतकरी, कामगार यांची काय अवस्था झाली आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. दौलतवर अनेक वर्षे तालुक्याचे राजकारण खेळले गेले. हेही सर्वांना ज्ञात आहे. दौलतचा वापर कशा-कशाला केला हे तालुक्यातील जनतेने पाहिले. दौलतवर अनेक स्थित्यंतरे झाली. २००१ मध्ये दौलतचे तत्कालीन अध्यक्ष नरसिंगराव पाटील यांचे मेहुणे दौलतचे कार्यकारी संचालक गोपाळराव पाटील यांनी बंड करत दौलतची सत्ता हस्तगत केली होती. हा जरी इतिहास असला तरी या सत्तासंघर्षात दौलतचा बळी गेला असून, याची फळे मात्र शेतकरी व कामगारांना भोगावी लागत आहेत.
अनेक अडचणींवर मात करून विद्यमान संचालक मंडळ दौलत सुरू करतील, या आशेपोटी कामगारांनी गेले ४५ महिने दौलतची राखण केली. उपाशीपोटी कारखान्याचा सांभाळ केला. कारखाना सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या आल्या, पण सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे म्हणा किंवा दौलतवर झालेले अवाढव्य कर्ज यामुळे कंपन्याही धजावत नसाव्यात. तालुक्याची अस्मिता व आर्थिक केंद्रबिंंदू असलेला दौलत सुरू व्हावा, ही जनतेची इच्छा आहे.
दौलतसाठी शेतकरी, कामगार यांनी आजपर्यंत त्यागाची भूमिका घेतली आहे. ते यापुढेही घेतील पण खरा प्रश्न आहे तो दौलतवरील कर्जाचा. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत जात आहे. शासनदरबारी प्रयत्न करून या कर्जावरील व्याज तरी थांबवून घेतले पाहिजे. विद्यमान संचालक मंडळाने मरगळ झटकून यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा दौलतचा लिलाव एक दिवस ठरलेला आहे. त्यावेळी तालुक्यातील शेतकरी, कामकरी जनता व कामगार या विद्यमान संचालक मंडळाला कधीच माफ करणार नाही.

‘दौलत’साठी तालुक्यातून निधी जमवावा !
बंद अवस्थेत असलेला दौलत कारखाना सुरू करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळासह गोपाळराव पाटील, नरसिंगराव पाटील, भरमूअण्णा पाटील, संभाजीराव देसाई, प्रभाकर खांडेकर, मोहन कांबळे, सुरेशराव चव्हाण-पाटील यांच्यासह दौलतच्या माजी संचालकांनी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांनी निधी जमविल्यास दौलत सुरू होऊ शकतो. मात्र, विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे देऊन दौलत जनतेच्या हाती सोपवायला हवा.

..तर ‘दौलत’चा लिलाव अटळ
४भौगोलिकदृष्ट्या आशिया खंडात परिपूर्ण असलेला दौलत कारखाना
३ हंगाम बंद आहे. सहकाराच्या नियमानुसार ३ वर्षे बंद असलेली सहकारी संस्था आजारी म्हणून घोषित करून ती अवसायनात काढली जाते किंवा त्याचा लिलाव केला जातो.
४राजकारणात व सहकारात कधीही काहीही होऊ शकते. दौलतची वाटचाल ही त्याच दिशेने सुरू असल्याचे सहकारातील जानकारांचे मत आहे. त्यामुळे भविष्यात दौलतचा लिलाव होऊन तो दौलतशी संबंधित व्यक्तीनीच घेतल्यास नवल वाटायला नको ! हे टाळायचे असेल, तर तालुक्यातील जनतेने उठाव करणे गरजेचे आहे. अन्यथा दौलतचा लिलाव अटळ आहे.

Web Title: Will 'Daulat' work start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.