मराठा समाजासाठी शक्य ते सर्व करु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही; अभिनंदनासाठी कोल्हापूरकरांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:05 IST2025-01-27T12:04:28+5:302025-01-27T12:05:36+5:30
शिंदे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले

मराठा समाजासाठी शक्य ते सर्व करु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही; अभिनंदनासाठी कोल्हापूरकरांची झुंबड
कोल्हापूर : मराठा समाजासाठी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले; परंतु महाविकास आघाडीला ते टिकवता आले नाही. त्यानंतर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर खास अधिवेशन घेऊन १० टक्के आरक्षण दिले. त्याविरोधात आघाडीचेच काहीजण न्यायालयात गेले ही वस्तुस्थिती आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजासाठी अनेक योजना गेल्या दहा वर्षांत सुरू करून त्या कार्यरत आहेत. त्यामुळे मराठा समाजासाठी शक्य आहे ते सर्व केले आहे आणि यापुढेही करणार आहोत, अशी नि:संदिग्ध ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.
शिंदे यांनी शनिवारी दुपारी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, उदय सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीदरम्यान कोल्हापूरला आलो होतो. महायुती विजयी झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येतो, असे मी जाहीर सभेत बोललो होतो. त्यानुसार आज दर्शन घेतले. अंबाबाईचा मोठा आशीर्वाद आम्हांला मिळाला आणि आम्ही मोठ्या पाठिंब्याने सत्तेवर आलो. यावेळी अर्जुन आबिटकर, रवींद्र माने, सुजित चव्हाण उपस्थित होते.
शिंदे म्हणाले
- पात्र लाडक्या बहिणींच्या योजनेत खंड पडणार नाही.
- महाविकास आघाडीला जनतेने जागा दाखवून दिली.
- बदलापूर प्रकरण न्यायालयात, त्यावर बोलणार नाही.
- एस.टी.च्या चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडेवाढ
- दावोसमध्ये याआधीही चांगली गुंतवणूक झाली आहे. आता तर देशाच्या ५२ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे.
अभिनंदनासाठी झुंबड
विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर शिंदे यांचा हा पहिलाच दौरा होता. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. त्यामध्ये राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील शिवसैनिकांची संख्या लक्षणीय होती. शिंदे मंदिरात जाताना आणि येताना अक्षरश: चेंगराचेंगरी झाली. अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी गर्दी केली होती.