हातकणंगलेतून लढणार; सदाभाऊ खोत यांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:57 AM2017-09-18T00:57:49+5:302017-09-18T00:57:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : दोनशे किलोमीटर जाऊन पाच लाख मते मिळाली होती. घरच्या मैदानात लढायला कोणतीही अडचण असणार नाही, असे सांगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत रविवारी पत्रकार परिषदेत दिले.
शिरोळ येथे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री खोत यांची ही पत्रकार परिषद झाली. ‘स्वाभिमानी’चा उल्लेख न करता दसरा मेळाव्यात त्यांच्या पक्षाला भगदाड पडल्याचे दिसेल असेही ते म्हणाले. नव्या संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून, येत्या दसरा मेळाव्यास विचारांतून परिवर्तनाचे सोनं लुटण्यासाठी आम जनतेने मोठ्या संख्येने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
२१ सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी नव्या संघटनेची घोषणा कोल्हापुरात होणार आहे. यावेळी संघटनेचा मसुदा, झेंडा व बिल्ला यासह दिशा स्पष्ट केली जाणार आहे. त्यानंतर येत्या ३० सप्टेंबरला इचलकरंजी येथे होणाºया दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी शिरोळ तालुक्यात दौरा केला असे खोत यांनी सांगितले.
मंत्री खोत म्हणाले, मी लढवय्या कार्यकर्ता आहे. माझ्या चळवळीवर जनतेचा विश्वास आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. सर्वच घटकांतील प्रश्न घेऊन संघटना पुढे जाणार आहे. संवादातून संघर्षाकडे अशी वाटचाल केली जाणार आहे, असेही खोत म्हणाले.
बैठकीस भाजपचे सुरेशदादा पाटील, सागर खोत, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, रणजित पाटील, विजय भोजे, धैर्यशील देसाई, आप्पासाहेब काळे, बजरंग काळे, आदी उपस्थित होते. दरम्यान, जयसिंगपूर येथे शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन मंत्री खोत यांनी चर्चा केली.
‘स्वाभिमानी’च्या बालेकिल्ल्यात रणनीती
शिरोळ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला मानला जातो. यातच खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात फूट पडली आहे. अशातच मंत्री खोत तालुक्यातील उमळवाड, कोथळी, दानोळीसह परिसरात दौरा व बैठका घेत आहेत. या बैठकीत स्वाभिमानीचे कार्यकर्तेही सहभागी होत आहेत. त्यामुळे आगामी कोणत्या निवडणुकीची रणनीती आखली जात आहे, याची चर्चा आहे. शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात आता मंत्री खोत यांची एंट्री चर्चेची ठरली आहे.