आघाड्यांचे भूत कोल्हापूरच्या मानगुटीवर पुन्हा बसणार काय..?
By admin | Published: October 9, 2015 11:57 PM2015-10-09T23:57:38+5:302015-10-10T00:02:30+5:30
मतदारांचीच कसोटी : काँग्रेसला रोखण्यासाठी ‘ताराराणी’ मैदानात
विश्वास पाटील -- कोल्हापूर--महापालिकेच्या राजकारणातील काँग्रेसच्या वर्चस्वाला मोडून काढण्यासाठी ताराराणी आघाडी मैदानात उतरली आणि आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाचा उदय झाला. आता पुन्हा तोच अजेंडा घेऊन महाडिक यांच्या छुप्या नेतृत्वाखालील ही आघाडी या निवडणुकीत मैदानात उतरली आहे. सत्ता हेच मुख्य साध्य असलेल्या या आघाडींचे भूत कोल्हापूरची जनता मानगुटीवर बसू देणार काय, हीच खरी उत्कंठा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधीही पक्षीय सत्ता असेल, तर काही प्रमाणात तरी कारभारावर वचक राहतो. केंद्र व राज्य शासनाकडून निधी आणता येतो. गेल्या पाच वर्षांत पक्षीय राजकारणामुळे हजार-बाराशे कोटी रुपये आले व घोडेबाजार झाला नाही. महाडिक यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी भूखंड लाटले नाहीत की कोणत्या टेंडरमध्ये रस दाखविला नाही, हे खरे असले तरी पदाधिकारी निवडून द्यायचे आणि तिथे काय चालते याकडे मात्र काडीचे लक्ष द्यायचे नाही, असा त्यांचा व्यवहार राहिला. त्यांच्याकडे एकहाती सत्ता होती. त्यावेळी या शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची त्यांना संधी होती; परंतु तसे काहीच झाले नाही. फक्त व्यक्तिगत वर्चस्वाच्या राजकारणातच ते अडकून पडले. त्यातून ते आजही बाहेर आलेले नाहीत. आताही त्यांची ताराराणी आघाडी म्हणजे महाडिक गटाचे राजकारण पुन्हा प्रस्थापित करण्याचाच प्रयत्न आहे. लोकांचे प्रश्न, विकासाचे राजकारण असले काही विषय त्यांच्या खिजगणतीत नाहीत.
कोल्हापूरच्या नगरपालिकेची महापालिका करण्याचे श्रेय दिवंगत नेते श्रीपतरावदादा बोंद्रे यांना जाते. त्यामुळे महापालिकेत सुरुवातीची पाच ते सहा वर्षे त्यांचा वचक राहिला. पुढे तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नेतृत्व मानणारा गट सत्तेत आला. दादा-साहेबांचे दरबारी राजकारण मोडून काढण्यासाठी महादेवराव महाडिक, व्ही. बी. पाटील, पत्रकार बी. आर. पाटील, पापा कौलवकर यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले. पुढे एका टप्प्यावर त्यातील महाडिक वगळता अन्य बाजूला झाले व काँग्रेसमधील राजकारणाची सोयरिक म्हणून त्यात पी. एन. पाटील, अरुण नरके यांचा समावेश झाला. किमान दहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक-नरके-पाटील या ‘मनपा’ लॉबीचे वर्चस्व राहिले. महाडिक महापालिकेत सत्ताधारी, पी.एन. हे सलग पाच वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले व इकडे ‘गोकुळ’मध्ये अरुण नरके सलग दहा वर्षे अध्यक्ष झाले. पुढे सांगरूळ मतदारसंघात महाडिक यांनी उघड पाठिंबा देऊन आतून धोका दिल्याचा अनुभव आल्यावर पी. एन. व महाडिक यांच्यात वैमनस्य आले. तत्पूर्वी १९९० च्या सुमारास ताराराणी आघाडीचा जन्म झाला; परंतु ही आघाडी निवडणुकीनंतर अस्तित्वात येई. प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून येत. त्यांना एकत्र करण्याचे काम महाडिक करीत असत. सुरुवातीच्या टप्प्यात या आघाडीने सामान्य कार्यकर्त्याला सत्तेची संधी दिली. शिवाजी पेठेतील सरदार तालीम प्रभागातून गाजलेल्या लढतीत शिवाजीराव चव्हाण यांचा पराभव करून भिकशेट पाटील विजयी झाले व महाडिक यांनी त्यांना १९९० ला महापौर केले. त्यामुळे महाडिक यांची चांगलीच ‘क्रेझ’ तयार झाली.
-/ पान ८ वर
एकमेव विजय
गतनिवडणुकीत शाहू आघाडीच्या यशोदा मोहिते या गंजीमाळ प्रभागातून विजयी झाल्या. त्यांना १३०३ मते मिळाली. मोहिते या माजी नगरसेवक प्रकाश मोहिते यांच्या पत्नी होत. हे मोहिते आमदार महाडिक यांचे निष्ठावंत. काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांच्या आग्रहामुळे सचिन चव्हाण यांच्या पत्नीस मिळाल्याने मोहिते शाहू आघाडीकडे गेल्या. आता याच सौ. मोहिते भाजपकडून संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून, तर स्वत: मोहिते नाथागोळे प्रभागातून ताराराणी आघाडीकडून रिंगणात आहेत.
विक्रमसिंह घाटगे यांची ‘शाहू आघाडी’
शाहू आघाडी दहा ठिकाणी दुसऱ्या स्थानांवर होती. त्यामध्ये शुगरमिल, कसबा बावडा, हनुमान तलाव, पोलीस लाईन, राजर्षी शाहू मार्केट यार्ड, शाहूपुरी उत्तर, विक्रमनगर, जवाहरनगर, पांजरपोळ, सागरमाळ या प्रभागांचा समावेश होता. या आघाडीचे शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे हे प्रमुख होते. ही आघाडी महाडिक यांचीच डमी असल्याची टीकाही त्यावेळी सातत्याने झाली. महापालिकेच्या राजकारणात यापूर्वी महालक्ष्मी आघाडी, नगरविकास आघाडी, शहर विकास आघाडी अशाही काही आघाड्या होऊन गेल्या आहेत
ले खा जो खा
स्थानिक आघाड्या.