महापुरातील ऊसतोडीला प्राधान्य देणार : राहुल आवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:25 AM2021-08-26T04:25:09+5:302021-08-26T04:25:09+5:30
दानोळी : शिरोळ, हातकणंगले तालुक्यात कारखाना कार्यक्षेत्रातील २२० गावांतील नोंदी असलेल्या बुडित क्षेत्रातील प्राधान्याने ऊसतोडणी यंत्रणा राबविणार असून जवाहर ...
दानोळी : शिरोळ, हातकणंगले तालुक्यात कारखाना कार्यक्षेत्रातील २२० गावांतील नोंदी असलेल्या बुडित क्षेत्रातील प्राधान्याने ऊसतोडणी यंत्रणा राबविणार असून जवाहर साखर कारखाना पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी राहणार आहे, असे मत जवाहर कारखान्याच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी व्यक्त केले.
कवठेसार (ता. शिरोळ) येथील महापुराने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी आवाडे यांनी केली.
यावेळी ते म्हणाले, २००५, २०१९ ला आलेल्या महापुरात बुडीत क्षेत्रातील सर्वाधिक ऊसतोडणी जवाहर कारखान्याने केली. यावर्षीही मोठी यंत्रणा राबवून ऊस तोडणी करण्यात येणार आहे तसेच नुकताच केलेल्या आडसाली लागणी पुरामुळे गेल्या आहेत. यासाठी कारखान्यामार्फत चांगल्या प्रतीची ऊस रोपे दिली जाणार आहेत.
पूरबाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच आणखी कोणत्या उपाययोजना राबविता येतील. याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून दिलासा दिला. अनेकवेळा आलेल्या पूरकाळात जवाहर कारखान्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला तसेच अनेकवेळा जळीत उसाची कमी कपात करून प्राधान्याने तोडणी केली आहे. कारखान्याने केलेल्या मदतीची जाणीव शेतकऱ्यांनी ठेवली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी तसेच कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी व उपस्थित होते.
फोटो - २५०८२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कवठेसार (ता. शिरोळ) येथील पूरबाधित क्षेत्रातील ऊस पिकाची पाहणी राहुल आवाडे यांनी केली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.